हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला रेल्वेमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

२७ वर्षानंतर राजधानी एक्सप्रेसला हिरवा झेंडा
राजधानीत एक्सप्रेसमध्ये व्हर्च्युअल थ्रीडी ग्राफिक वाय फायद्वारे आपल्या स्मार्ट फोनवर पाहता येणार
मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.
दिवा-वसई पुल, पेण-रोहा रेल्वेमार्गातील विद्युतीकरण आदींचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आला.

(श्री. सतिष एस राठोड) ✍

मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिल्ली अवघ्या १९ तास ३० मिनिटांत पोहोचविणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा शुभारंभ आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून झाला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून डिजिटल पद्धतीने रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रोहा येथून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी एकाचवेळी दिवा -पनवेल-रोहा या ट्रेनचा शुभारंभ केला. याचबरोबर पुणे-कर्जत-पनवेल पॅसेंजर विस्तारीत सेवेचाही डिजिटल पद्धतीने रेल्वेमंत्री श्री. गोयल यांनी तर पनवेल येथे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एकाच वेळी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.

यावेळी रेल्वेमंत्री श्री. गोयल आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पनवेल स्थानकातील सुधारणांच्या सुविधांचे, पश्चिम रेल्वेवरील २१ स्थानकांवर ४० नव्या एटीव्हीएम मशीनचे, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण या स्थानकावरील प्रकाश व्यवस्थेमध्ये सुधारणांचे, घाटकोपर स्थानक एईडी व्यवस्था, दिवा-वसई पुल, पेण-रोहा रेल्वेमार्गातील विद्युतीकरण आदींचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. तर, श्री. आठवले यांच्या हस्ते १०० फुटांचा राष्टध्वज समर्पित करण्यात आला. नव्याने सुरु झालेल्या राजधानीत एक्सप्रेसमध्ये व्हर्च्युअल थ्रीडी ग्राफिक वाय फायद्वारे आपल्या स्मार्ट फोनवर पाहता येणार असून, त्याचाही प्रारंभ यावेळी करण्यात आला.

२७ वर्षानंतर राजधानी एक्सप्रेस सुरू होत असून, मध्य रेल्वेच्या सेवेतून पहिली राजधानी एक्सप्रेस सुरू होणे ही रेल्वे प्रशासनासाठी अभिमानास्पद बाब आहे. १९ तास ३० मिनीटात दिल्ली गाठणारी ट्रेन कल्याण-नाशिक-जळगाव-भोपाळ-झाशी या वेगळ्या पर्यटक मार्गाने जाणार असून, जास्तीत जास्त प्रवाशांना आता दिल्लीचा प्रवास सुखकर होणार आहे. एका दिवसात १०० टक्के ही ट्रेन आरक्षित झाली ही आनंदाची बाब आहे. रेल्वेमंत्री गोयल यावेळी म्हणाले कि, प्रवाशांचा हा प्रतिसाद पाहता मुंबई-दिल्ली फेऱ्या वाढविण्याचा विचार करण्यात येईल.

मुंबई रेल मंडळ हे १०० टक्के विद्युतीकरण असलेले पहिले मंडळ आहे. मध्य रेल्वेची ही पहिली राजधानी ट्रेन ऐतिहासिक ठरणार असून, राज्याच्या विकासासाठी मुंबई रेल मंडळात केंद्र आणि राज्य शासनाच्या सहाय्याने ७५ हजार कोटी एवढी गुंतवणूक करण्यात येणार आहे. याचबरोबर भारतीय रेल्वे १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचेही रेल्वेमंत्री यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार सर्वश्री राज पुरोहित, आशिष शेलार, प्रशांत ठाकूर, कॅप्टन आर. तमिल सेल्वन, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा, पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक ए.के.गुप्ता आदी उपस्थित होते.

Leave a Reply