“शेतकऱ्याच्या जीवनात समृद्धी पेरणारे स्व.वसंतरावजी नाईक”

शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी पेरणारे कै. वसंतराव नाईक

शेती आणि शेतकऱ्यांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या वसंतरावांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यकाळाचे तब्बल एक तप शेतकऱ्यांच्या भल्यासाठी खर्ची घातले. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री म्हणून वसंतरावांनी घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी व प्रगतीसाठी केलेली धडपड अजोड म्हणावी लागेल. 

“हिरवी शेती, हिरवी राने वाऱ्यावर झुलती, 
पीक पाचूचे आनंदाने गीत तुझे गाती’ 

हिरवा शालू पांघरलेली काळी धरित्री पाऊस धारांनी ओलीचिंब होते, तेव्हा शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी पेरणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची आठवण तीव्रतेने झाल्याशिवाय राहत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील डोंगरकुशीत, आडवळणावर वसलेल्या पुसद तालुक्‍यातील एका छोट्याशा गहुली गावात वसंतरावांचा जन्म झाला. आपल्या कर्तृत्वातून पुरोगामी महाराष्ट्रात समृद्धीचा दरवळ फुलविला. शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी, किंबहुना त्यांच्या प्रगतीसाठी वसंतरावांनी आपले आयुष्य वाहून घेतले. 

महाराष्ट्राची धुरा पहिल्यांदा 5 डिसेंबर 1963 साली वसंतरावांनी सांभाळली, तेव्हाचा काळ अनेक अडचणींनी भरलेला होता. महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात आणल्यानंतर हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून गेला. तेव्हा पुरोगामी महाराष्ट्र निर्मितीच्या कार्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वसंतराव नाईक यांच्यावर येऊन पडली. 1972 चा दुष्काळ आणि भारतावर दोन वेळा आलेले युद्धाचे संकट, कोयनेचा भूकंप, अशी संकटांची मालिका झेलत वसंतराव नाईक यांनी धीरोदात्तपणे संकटांना आव्हान समजून महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर नेले. दुष्काळाच्या काळात जनता अन्नाच्या कणास मोतास झाली होती. 

अन्नटंचाईमुळे सर्वत्र दाणादाण उडाली होती. या संकटाला सामोरे जाताना महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याची वसंतरावांनी भीष्मप्रतिज्ञा घेतली. पुण्याच्या शनिवारवाड्यासमोर भल्या मोठ्या सभेत त्यांनी घोषणा केली- “येत्या दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाहीतर जाहीरपणे फाशी घेईल’, त्यांच्या या घोषणेवर टीकाटिप्पणी झाली. मात्र यातून प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा आत्मविश्‍वास निर्माण झाला. 

अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी भरघोस उत्पादन देणाऱ्या हायब्रीड ज्वारीच्या वाणाला त्यांनी प्रोत्साहन दिले. या संकरित वाणाचा प्रयोग त्यांनी स्वत:च्या शेलू येथील शेतीत केला. शुभ्र दाण्यांनी लगडलेली हातभर लांबीची कणसे पाहून शेतकऱ्यांचे डोळे भरून आले. एखाद्या झपाटलेल्या शास्त्रज्ञाप्रमाणे वसंतराव शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले, मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यात थांबवून रस्त्यालगतच्या शेतात ते थांबले आणि संकरित ज्वारीच्या वाणाचा प्रसार आणि प्रचार केला. भरघोस पीक काढणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीवरून त्यांनी मायेने हात फिरविला. यातून शेतकऱ्यांमध्ये चैतन्य पसरले आणि पाहता-पाहता अन्नधान्य टंचाईवर मात करता आली. केवळ संकरित वाण निर्मिती करून भागणार नाही तर शेतीचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजे, यासाठी त्यांनी महाराष्ट्रात स्वतंत्र चार कृषी विद्यापीठांची निर्मिती केली. हा निर्णय म्हणजे वसंतरावांच्या शेतीविषयक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सर्वोच्च कळस होता. 

ठिबक सिंचन ही संकल्पना त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी अमलात आणली आणि आता ही कल्पना तुषार सिंचन पाणी पद्धतीत रूढ झाली. वसंतरावांनी शेतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. केळी असो वा कापूस, ऊस असो वा अंगूर सर्वच पिकांचे प्रयोग त्यांनी आपल्या शेतीत केले आणि शेतकऱ्यांसमोर समृद्ध शेतीचा आदर्श समोर ठेवला. केवळ संकरित वाणाने उत्पन्न वाढविणे अवघड आहे. त्याच्या जोडीला कमी पावसात भरघोस उत्पादन देणारे बियाणे शोधणे, शेतीविषयक संशोधनाची गरज त्यांनी लक्षात घेतली. शेतकऱ्यांच्या बांधावर आधुनिक शेतीतंत्रज्ञान पोचण्यासाठी राहुरी, अकोला, परभणी व दापोली ही कृषी विद्यापीठे आज चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे. वसंतराव नेहमी म्हणत “शेती पाण्याने भिजवा, पाणी नसेल तर घाम गाळा. श्रमातून शेती फुलेल.’ कोरडवाहू शेतीला सिंचनाची जोड देण्यासाठी त्यांनी “पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मूलमंत्राचा पुरस्कार करून शेतात बांधबंदिस्ती, नाल्यावर बांध बांधून पाणी अडविण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. तसेच राज्यभर सिंचन व्यवस्था वाढीसाठी जायकवाडी महाप्रकल्प, उजनी, अरुणावती, इसापूर, पूस, अप्पर वर्धा, अशा सिंचन प्रकल्पांना उभारी दिली. गावोगावी शेततलाव, तळी व विहिरी खोदण्याचे काम हाती घेतले. यातून तुंबलेल्या पाण्यावर भरघोस पीक बहरले व शेती सुजलाम सुफलाम झाली. 

सिंचनातून भरघोस उत्पादन काढण्यासाठी त्यांनी आपल्या मतदार संघातील पुसद तालुक्‍यात पूस प्रकल्पाची मुहूर्तमेढ केली. प्रकल्प पाण्याने तुडुंब भरला. मात्र शेतकरी या प्रकल्पातील पाणी घेण्यास तयार नव्हते. पारंपरिक शेती दूर सारून दुबार पीक घेण्याचे धाडस होत नव्हते, अशावेळी स्वत: वसंतरावांनी गावागावांत शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या व त्यातून रब्बी गव्हाच्या भरघोस उत्पादनाचे उदाहरण समोर ठेवले. धरणाचे पाणी वापरण्यास धजावणारे शेतकरी आज पाण्यासाठी स्पर्धा करीत आहे आणि त्यातून भरघोस पीक काढून आघाडी घेत आहे, हे वसंतरावांच्या दूरदृष्टीचे द्योतक होय. शेती सोबतच शेतीपूरक उद्योगांसाठी त्यांनी चालना दिली. कुक्‍कुटपालन, पशुपालन, दुग्धोत्पादन यांसारख्या प्रयोगाचे धडे त्यांनी आपल्या शेलू येथील शेतीतून दिले. त्यांची शेलू येथे दूध डेअरी परिसरात प्रसिद्ध होती. यातून अनेक शेतकऱ्यांनी जोडधंद्याची प्रेरणा घेतली. 

वसंतरावांची दूरदृष्टी प्रत्येक गोष्टीत दिसून येते. पंचायतराजचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदांची निर्मिती केली. आज याद्वारे सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन कल्याणकारी योजनांचा लाभ गावखेड्यापर्यंत पोचला आहे. दुष्काळाची भीषणता अनुभवताना त्यांनी शेतमजुरांच्या हातांना काम मिळेल यासाठी “रोजगार हमी योजना’ राज्याला दिली. महाराष्ट्रातील कष्टकरी शेतमजुराचा स्वाभिमान वसंतरावांनी खऱ्या अर्थाने जागविला आणि दुष्काळात या शेतमजुराला वाऱ्यावर न सोडता त्याला रोजगार मिळवून दिला. या योजनेचे कल्पक वि. स. पागे यांच्या सोबत चर्चा करून सात रात्री बैठकी घेऊन अनोखी अशी रोजगार हमी योजना राज्यात लागू केली. या योजनेतून उत्पादक कामांना त्यांनी चालना दिली. खडीकरणातून रस्ते साकारले, तळी खोदल्या गेली, साचलेला तळ्यातील गाळ बाहेर आला आणि मुख्य म्हणजे मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. ही योजना आता केंद्र सरकारने पुरस्कृत केली आहे. यातच त्यांच्या दूरदृष्टीचे गमक सहजतेने लक्षात येते. रोजगार हमी योजने सोबतच जिल्हा नियोजन वसंतरावांच्या दूरदृष्टीतून पुढे आले. 

विदर्भात पिकणारा कापूस शेतातून बाजारात आला, की तो बेभाव विकला जात असे. व्यापारी, दलालांकडून होणारा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण पाहवले जात नव्हते. यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन सहकार मंत्री यशवंतराव मोहिते यांनी कापूस खरेदी योजनेची कल्पना पुढे आणली. नाईक साहेबांनी या योजनेला कापूस एकाधिकार योजना या स्वरूपात मूर्त स्वरूप दिले व शेतकऱ्यांना व्यापारी व दलालांच्या विळख्यातून मुक्‍त केले. पुढे ही योजना वेगवेगळ्या कारणांमुळे यशस्वी होऊ शकली नाही. मात्र योजनेतूनच शेतकऱ्यांना शेतीमालाच्या आधारभूत किमतीचा आधार प्राप्त होऊ शकला. वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा नेहमी विचार केला. “शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल, शेती मोडली तर लोकशाही मोडेल’, असे खणखणीत विचार 7 जून 1971 रोजी नाशिक येथे भरलेल्या कॉंग्रेस शिबिरात व्यक्‍त केले होते. वसंतराव नाईक हे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने कैवारी होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षास 1 जुलैपासून सुरवात होत आहे. शेतीतून समृद्धी मिळविण्यासाठी त्यांच्या विचारांचे पोषण होणे गरजेचे आहे. कै. वसंतराव नाईक यांना 1 जुलै,102 व्या जयंती निमित्त
महा नायकाला !
विनम्र अभिवादन..
सौजन्य:- गोर कैलास डी.राठोड
स्वयंसेवक / प्रचारक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,

image
Tag : Vasantrao Naik, Banjara, Bazigar, Lambani, Lamani