व्यसनमुक्ती कायदा कठोर झाला पाहीजे

तंबाखू आणि पान खाऊन रस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या – पिचकार्या टाकणार्यांवर आता कायद्याचा बडगा उगारला जाणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने रेल्वे स्थानकात सिगारेट ओढण्यावर आणि विक्रीवर बंदी घातली होती. त्याच कायद्याचा आधार घेत आणि मुंबई पोलीस कायदा 1951 मधल्या तरतुदीनुसार सार्वजनिक ठिकाणी धुपान आणि थुंकण्यास बंदी असलेल्या कायद्यात आमूलाग्र सुधारणा घडवायचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. या नव्या कायदेशीर सुधारणेनंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या व्यक्तीला पाचशे रुपयांच्या दंडाबरोबरच जवळच्या सरकारी रुग्णालयात साफसफाईचे काम करावे लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला सार्वजनिक जीवनात महत्त्व द्यायसाठी आणि सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ राहावीत यासाठी सरकारने तंबाखू खाऊन पचापचा थुंकायची सवय लागलेल्या लोकांच्यावर त्यांना सफाईचे काम लावायचाही निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी धु —पान आणि थुंकण्यास प्रतिबंध असलेला कायदा सध्या अस्तित्वात असला तरी त्याची अंलबजावणी मात्र होत नाही. हुंडाबंदी आणि अन्य कायद्यांसारखाच सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारा हा कायदा कागदावरच राहिला आहे. काही वर्षांपूर्वी राज्यातल्या काही महापालिका आणि नगरपालिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांकडून 200 रुपये दंडाची वसुलीही सुरू केली होती. प्रारंभी काही महिने हजारो लोकांकडून हा दंड वसूल झाला. पण पुढे मात्र ही मोहीम बारगळली आणि भारतीय समाजाला लागलेला अस्वच्छतेचा हा भीषण रोग अधिकच वाढला, बळावला आहे. राज्यात गुटख्यावर बंदी नव्हती तेव्हा सार्वजनिक ठिकाणी बेदिक्कतपणे थुंकणार्यांची संख्या काही लाखांनी वाढली होती. गुटख्याची गोळी सतत तोंडात ठेवायची सवय लागलेल्या या गुटखेबाजांच्यामुळे दररोज रस्त्यावरही गुटखा खाऊन फेकलेल्या कोटय़वधी पुडय़ांचा प्रचंड कचरा रस्त्यात होत असे.

महाराष्ट्र सरकारने गुटख्याच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी तर घातलीच. पण त्या कायद्याची अत्यंत कडक अंलबजावणी केल्यामुळेच महाराष्ट्र गुटखामुक्त झाला असला तरी तंबाखू wक्त मात्र झालेला नाही. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात सिगारेट -बिडी ओढणार्यांचे आणि तंबाखू -तंबाखूजन्य पदार्थ चघळणार्या लोकांचे प्रमाण वाढल्याचे ग्लोबल ऍडॅल्ट टोबॅको सर्वे 2010 च्या अहवालातल्या आकडेवारीने निष्पन्न झाले आहे. विशेषतः युवा वर्गात या अंली पदार्थाच्या खाण्याचे प्रमाण वाढले, ही अत्यंत गंभीर बाब होय. महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्यात पुरुषांचे प्रमाण 42 टक्के तर महिलांचे प्रमाण 18 टक्के इतके आहे. तंबाखूच्या सेवनामुळे 31 टक्के लोकांचा मृत्यू होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. राज्य सरकारने आणि समाजसेवी संघटनांनी तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम जनतेपर्यंत पोहोचवले असले तरी तंबाखूच्या व्यसनाधीनतेला आळा बसलेला नाही. सार्वजनिक आरोग्य बिघडवणारे हे व्यसन समाजात वाढत असल्यामुळे ते रोखायसाठी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आणि आरोग्य खात्याचे राज्यमंत्री राम शिंदे यांनी पुढाकार घेऊन या कायद्यात बदल घडवून कठोर अमंलबजावणी करायचा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला.

Leave a Reply