वकिलाला जशास तसे उत्तर देणाऱ्या पंढरपूरच्या पोलिस निरीक्षकाची व्हायरल पोस्ट

  • पोलिस खात्यातील मंडळी आपल्याविरुद्ध होणाऱ्या टिकेला शक्यतो जाहीरपणे उत्तर देत नाहीत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर तर पोलिसांवर तणाव वाढला आहे. कारवाई करावी तरी त्रास आणि न करावी तरी विचारणा, असा हा पेच आहे. त्यात पंढरपूर हे मराठा आरक्षण लढ्याचे सुरवातीला केंद्र बनले होते. तेथील पोलिस निरीक्षकानेच एका वकिलाला जशास तसे उत्तर सोशल मिडियातून दिले आहे. ते उत्तर अधिक टोकदार असल्याचे चर्चेत आले आहे.

तेथील पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याविरुद्ध एका वकिलाने तक्रार केली. या तक्रारीत जाधव यांच्यावर आरोप करण्यात आले होते. या आरोपाला जाधव यांनी एक पोस्ट स्वतः लिहिली आणि त्याला उत्तर दिले.एसटी बस तोडफोडीच्या गुन्ह्यामध्ये पोलिस ठाणे पंढरपूर तालुका येथे पाच आरोपींना अटक केली. त्यामध्ये व्यवसायाने वकील असलेल्या एका आरोपीचा समावेश आहे. सदर वकील यांचा गुन्ह्यामध्ये स्पस्टपणे सहभाग दिसुन आला आहे, वकील आरोपीने देखील मान्य केले आहे, त्याचे विडीओ रेकॉर्डींग देखील केले आहे. वकील आरोपीस त्याचे “वकील मित्र, नातेवाईक, परिचीत” भेटण्यास आले होते, परवानगी नंतर त्यांना भेट देखील करू दिली आहे, त्याची सरकार दप्तरी नोंद देखील आहे, त्याचे चित्रण CCTV मध्ये देखील आहे.

परंतु एक वकील महोदय कोणाला काही ही न-विचारता लॉक-अपकडे गेले, लॉक-अप मध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत, त्यांची पूर्ण जबाबदारी पोलिसांवर आहे. पहाऱ्यावरील अंमलदाराने अटकाव केला असता शाब्दिक वादावादी केली. मला आवाज आला म्हणुन मी उठुन कक्षाच्या बाहेर गेलो, मी त्यांना परवानगी शिवाय भेटता येणार नाही असं सांगताच त्यांना खूप राग आला मी त्यांना बसण्याची सुचना केली असता “मी निषेध करतो” असे म्हणुन निघुन गेले. याच ही रेकॉर्डींग पोलिसांकडे आहे.

सदर वकील आरोपीसह या गुन्ह्यातील आरोपींना मे. न्यायालयाने दोन दिवस PCR दिला आहे. त्या नंतर ही दिवस भरामध्ये वकील आरोपीचे नातेवाईक, परिचीत” भेटण्यास आले होते, परवानगी नंतर त्यांना देखील भेट करू दिली आहे, त्याचे ही चित्रण CCTV मध्ये देखील आहे. आज ही कोणी आलं तरी ही नियमांचे अधिन राहुन आम्हीं भेटू देवु.

मी कोणी अमुक आहे म्हणुन मला सरळ जावु द्यावे, आणी विचारले तर आम्ही त्याच भांडवल करू असे जर असेल तर येणारा काळ पंढरपूरसाठी चांगला नसेल, असं माझं मत आहे. पोलिसांना कायदा व नियमाप्रमाणे काम करू द्यावं, असं आम्ही आवाहन करतो.

माझ्यावर मुजोरपणाचा आरोप लावला आहे, मी स्पस्ट करू इच्छितो की, मी जशास तसं वागणारापैकी आहे. पोलिस ठाण्यात दिन, दलित, दुबळा गरीब आला तर आम्ही त्यांच्याशी जास्त सन्मानाने वागतो किंबहुना त्यांची तक्रार प्राधान्याने ऐकण्याची माझी पद्धत आहे. स्वच्छ कपडे घातलेल्याचे लगेच ऐकले जाते. मळकट, जुनी कपडे घातल्याचे सर्वसाधारणपणे लगेच ऐकले जात नाही असा आमच्या समाजाचा अलिखीत नियम आहे. एक वेळ अशी कमी शिकलेली माणसे सरळ लॉक-अपकडे गेली तर आम्ही समजु शकतो. परंतु ज्यांना कायदे, नियम सर्व समजते तर त्यांनी त्याचे पालन केले पाहिजे.

खुर्चीची चिंता नाही…..

या व्यवस्थेने जेवढ्या दिवस ही खुर्ची बसायली दिली आहे, त्या अधिकाराचा पुरेपुर वापर करू. मला खुर्चीची अजिबात चिंता नाही. मी कोणत्याही दबावाला भिणारा घाबरणाऱ्यापैकी नाही. अजिबात कचारणार किंवा मागे हटणारापैकी मी नाही. जेवढ्या दिवस आहे तेवढ्या दिवस ठणकावुन काम करू. व्यवस्था, नैतिकता असलेली चांगली माणसं, समजदार/जबाबदार पंढरपुरकर माझ्या सोबत असतील याची मला खात्री आहे.

येणाऱ्या काळात ही आम्ही याच पद्धतीने सर्व सामान्य लोकांना न्याय कसा मिळेल असा प्रमाणिक प्रयत्न करू. “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” (सजनांचे रक्षण आणी दुर्जनांचा संहार) या उक्ती प्रमाणेच निष्पक्ष काम करू.

कोणाला आव्हान देण्याचा आमचा उद्देश नाही, आमचा पक्ष आम्ही मांडला आहे, जनतेने दिलेल्या टॅक्सच्या पैशामधुन आम्हाला पगार मिळतो. पोलीस खरच कस काम करतात हे त्यांना समजणे आवश्यक आहे म्हणुन ही पोस्ट लिहिली आहे.