मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत तुषार राठोड विजयी

नांदेड (प्रतिनिधी): मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुषार गोविंदराव राठोड हे विजयी झाले आहेत. पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज मुखेड येथे जिल्हा परिषद कन्या हायस्कूल येथे शांततेत व सुनियोजितपणे पार पडली. मतमोजणीच्या 23 फे-या अखेर श्री. राठोड 1 लाख 319 मते मिळवून विजयी ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रविंद्र बिनवडे यांनी जाहीर केले. श्री. राठोड यांना निकटचे प्रतिस्पर्धी उमेदवार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यापेक्षा 47 हजार 248 मताधिक्य मिळाले. MLA Tushar Rathod winविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 मध्ये निर्वाचित उमेदवार गोविंद मक्काजी राठोड यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी भारत निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. त्यानुसार सोमवार 13 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते. या पोटनिवडणुकीत 7 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे राष्ट्रीय  व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार-तुषार गोविंदराव राठोड (भारतीय जनता पार्टी)-1 लाख 319, हणमंतराव व्यंकटराव बेटमोगरेकर पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)-53 हजार 71. नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार-अजीमोद्दीन हाफेजसहाब (इंडियन युनियन मुस्लिम लीग)-1 हजार 145, विजय भिमराव कांबळे अखरगेकर (भारतीय रिपब्लिकन पक्ष-डेमोक्रटीक)-483. इतर उमेदवार – अनिल तेजेराव शिरसे-962, अफजल शेख उर्फ शेख सर-263, विजयमाला गजानन गायकवाड-511 (सर्व अपक्ष), वरील पैकी कोणीही नाही (None of the above- NOT)- 962. पोटनिवडणुकीसाठी पात्र मतदारांची संख्या 2 लाख 81 हजार 8 इतकी होती. त्यापैकी 56.12 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांनी निवडणुकीसाठी जिल्हा स्तरावरुन समन्वयन केले. तर या निवडणुक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणुक अधिकारी सुरेश घोळवे, देगलूरचे तहसिलदार जीवराज डापकर, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी शरद पवार, नायब तहसिलदार विजय चव्हाण, मुखेड निवडणुक विभागाचे नायब तहसिलदार संतोष बोथीकर, व्हि.टी गोविंदवार,एस.एम पांडे,एल.एस श्रृंगारे, श्री. मस्के, माध्यम कक्षाचे सुधीर रावळकर आदींनी मतदान ते मतमोजणी या कालावधीत वेगवेगळ्या जबाबदा-या पार पाडल्या.

Leave a Reply