मराठी भाषेला राज्यभाषेची घोषणा करते वेळी महानायकाचा भाषन,

!! मराठी असे आमुची मायबोली..!!
ती ‘आजपासुनी
    राजभाषा असे…
-:1 मे 1966 :-
महाराष्ट्र शासनाची राजभाषा ‘मराठी ‘
असल्याची घोषणा ना.वसंतराव नाईक यांनी या दिवसी केली आणि मराठीचा वापर ‘राजभाषा’
     म्हणून सुरू झाल्याची द्वाही
मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी फिरवली त्या दिवशीचे त्यांचे हे ऐतिहासिक भाषण.
……………..भाषण……………….
आजचा दिवस हा मराठीच्या राज्याभिषेकाचा दिवस म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
आजपासून चार कोटी मराठी जनतेची भाषा राजसिंहासनावर
विराजमान झाली आहे.त्या दृष्टीने यंदाच्या महाराष्ट्र-दिनाचे औचित्य विशेष आहे.
1 मे 1960 हा महाराष्ट्र-राज्य संस्थापनेचा दिवस.आजपर्यंत इंग्रंजीसारखी एक परकीय भाषा शासन व्यावहाराचे माध्यम राहिल्यामुळे शासन व जनता यांच्यामध्ये नेहमीच एक प्रकारचे अंतर राहिले.लोकशाहीत शासन व जनता यांच्यात जेवढी जवळीक निर्माण होईल तेवढी ती लोककल्याणाला पोषक ठरते व जनतेलाही स्वत:वरील जबाबदारी ओळखण्याची त्यामुळे संधी प्राप्त होते.
आजच्या राज्यव्यावहाराचे स्वरूप सचिवालय किंवा काही सरकारी कार्यालये एवढ्यापुरतेच मर्यादीत राहिले नसुन ग्रामपंचायतीपासुन ते विधान मंडळापर्यंतच्या सर्व शासन संस्थांच्या कारभारात त्यात समावेश होतो.अशा या व्यापक शासन व्यावहारात सर्व पातळीवर लोकांचे सहकार्य अपेक्षित असल्यामूळे,लोकांची भाषा ही राजभाषा ही राज्यकारभाराची भाषा व्हावी ही अपेक्षा अगदी न्याय्य आहे.महाराष्ट्रातील लोकमतही या बाबतीत जागरूक होतो.
तेव्हा मराठी हि कायदेशीर पणे महाराष्ट्राची राजभाषा ठरविण्याचे विधेयक शासनाने 1964 च्या डिसेंबरात विधानमंडळाकडुन संमत करून घेतले व त्याला रीतसर मराठी राजभाषा अधिनियमाचे स्वरूप दिले.या आधिनियमानुसार आता काही अपवाद वगळून राज्यातील शासनाचे बहुंताश कामकाज 1 मे 1966 पासुन मराठीतुन चालविण्यात यावे असे आदेश देण्यात येत आहेत.सहा वर्षापूर्वी महाराष्ट्राचे भाषिक राज्य स्थापन झाले त्याची ही सांगता झालेली पाहुन राज्यातील सर्व लोकांना आज आनंद व समाधान वाटेल यांत शंका नाही.तथापि या राज्यातच इतर भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांची यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय हौणार नाही,याची शासन काळजी घेईल.या दृष्टीने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मान्यता मिळालेल्या अल्पसंख्याक गटांच्या सोयीसाठी शासनाने महत्वाचे आदेश,अधिसूचना इत्यादी त्या त्या गटांच्या मातृभाषेतून काढण्याची व्यवस्था केली जात आहे.आणि त्यासाठी नागपुर,पुणे,औरंगाबाद,येथे भाषासंचालनालयाची विभागीय कार्यालये सुरू करण्याचे ठरविण्यात आले आहे.
राज्यकारभाराच्या मराठीकरणाचे यश पुष्कळ अंशी या राज्यातील मराठी व अमराठी भाषिक जनता,साहित्य संस्था,वृत्तपत्र शासकिय कर्मचारी या सर्वाच्या परिश्रमावर व सहकार्यावरच अवलंबून आहे.महाराष्ट्राची जनता या कामी शासनाला पुरेपुर सहकार्य देईल,असा मला विश्वास वाटतो….
जय महाराष्ट्र..
वसंतराव फुलसिंग नायक (नाईक)
1 मे 1966 रोजीच्या भाषणात.
सौजन्य:- गोर कैलास डी.राठोड
स्वयंसेवक गोर बंजारा संघर्ष समिती भारत,

Leave a Reply