बंजारा समाजातील प्रत्येक व्यक्तींनी अनिष्ठ रुढींचा त्याग करावा

समाजातील प्रत्येक व्यक्तीच जन्म घेतल्यानंतर वेगवेगळ्या ऋन्वामध्ये तो बंदिस्त असतो (मातृऋण, पितृऋण) तसेच ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे सामाजिक ऋण हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण मनुष्य जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्वस्वी सामाजिक ऋणामध्ये बांधलेला असतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला आपल्या समाजाचे ऋण फेडणे आवश्यक असते. म्हणजे नेमके काय केले पाहिजे. याचा विचार सहज मनात येतो. याचाच अर्थ असा होत नाही की, केवळ दान, धर्म गरिबांची सेवा याच्या माध्यमातूनच सामाजिक ऋण फेडता येते. प्रत्येक समाजात काही चांगल्या तसेच काही वाईट रुढी, परंपरा आहेत. या सर्व रुढी, परंपरा आपण आजही त्याच पद्धतीने चालवित आहोत.

मात्र काही सामाजिक प्रथा अशा आहेत ज्या समाजाला घातक आहेत. मग आपल्या समाजाला जागृत आपण केले पाहिजे. समाज जागृत होईल. चुकीच्या परंपरा बंद होतील. त्यामाध्यमातून निश्चित समाज सुधारण्यास मदत होईल. असा काहितरी एक विचार माझ्या मनात आला त्याच अनुषंगाने ‘बंजारा पुकारच्या’ माध्यमातून माझे विचार मांडण्याची संधी मला मिळाली. ज्या माध्यमातून काही चुकीच्या परंपरा आपण सोडल्या पाहिजे, असे मत मला स्पष्टपणे मांडता येईल. तसा बंजारा समाज अत्यंत प्राचीन संस्कृती घेऊन चालत आलेला समाज आहे. आधी भटक्या नंतर विमुक्त हा सर्व प्रवास आपल्याला इतिहास सांगतो आपल्या या समाजातील काही चांगल्या प्रथा आहेत. त्या आदर्श ठेवतात. उदा. तीज या सनाला एकत्र येऊन जो वेळ आपण एकत्र घालवतो निश्चितच त्यावेळी समाजातील लोक एकत्र येवून समाज जोडण्यास मदत होते.

दिवाळीला मेरा मांगणे आणि मोठय़ांचा आशिर्वाद घेणे, पोळ्याला प्रत्येक घरी जाऊन नमस्कार करणे, होळी या सणाला सर्वांनी एकत्र येऊन सण साजरा करणे, आपले विचार एकमेकांसमोर मांडणे, लग्न प्रसंगी फेरे घेऊन मुलगी सासरी जाताना भावाला आहेर करण्याची पद्धती. एवढय़ा लाडात वाढलेली लाडकी परक्याचे धन होऊन सहज आपले घर सोडते तेव्हा आपल्या कुटुंबाप्रती व्यक्त होणारे दुःख त्यातून आपणास दिसून येते असे अनेक उदाहरणं आहेत. ज्यातून समाजाचा चांगला प्रतिबिंब आपल्या डोळयासमोर उभे राहते. मात्र चांगल्या बरोबरच काही चुकीच्या परंपराही आपण आजही जोपासतो आहे. आज आपण भटके नसून आपण स्थिर झालेलो आहोत. मात्र त्यामुळेच आपण समाजाचा विकास साधू शकत नाही. आज आपले शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रगत होत चालले मोठय़ा प्रमाणात समाजातील व्यक्ती मोठमोठय़ा पदावर आरुढ होत आहेत. तरीही लग्नप्रसंगी वर पक्षाकडून मुली कडून होणारी हुंडय़ाची मागणी ही पद्धत अत्यंत चुकीची आहे.

आपण एकीकडे स्वतःला सुशिक्षीत म्हणतो. मात्र आपल्याच समाजातील व्यक्तीकडून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात हुंडा घेणे किती योग्य आहे? कदाचित या प्रथेमुळे अनेक गरीब घरातील चांगल्या मुली या पद्धतीची बळी पडतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीनेच सामाजिक कोणत्याही लग्न प्रसंगी हुंडा घेणे तथा देणे टाळणे आवश्यक आहे. अशाच प्रकारची देवाला बकरा बळी देण्याची प्रथा आपल्या समाजात आपणास दिसून येते. ह्या प्रथा समाजातून बंद झाल्यास मोठय़ा प्रमाणात समाज जो आर्थिक परिस्थितीत जकडत चालला आहे. तो पुर्णपणे मुक्त होऊल आणि यामुळे तो आपल्या घराची चांगली प्रगती करु शकेल. आपल्या मुलांना चांगले व उच्च शिक्षण देऊ शकेल आणि इतर समाजात तो सन्मानाने जगू शकेल. या सर्व प्रथेला आपणाला ह्या अनिष्ठ रुढीला वेळीच पायबंदी करणे आवश्यक आहे.

संपादक:
गोविंदराव एच. चव्हाण (वडचुनेकर)
(बंजारा पुकार)

Leave a Reply