बंजारा समाजाचा विकास कसा होईल

संपूर्ण भारत देशामध्ये बंजारा हा समाज विखुरलेला आहे. विविध राज्यामध्ये कमीजास्त प्रमाणात हा समाज विखुरलेला असला तरी, या समाजाला त्या त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. लमाण, लमाणी, लंबाडा बंजारी, बनजारा आणि बंजारा आदि नावाने हा समाज ओळखला जातो. या समाजाचे राजकीय ईतिहासाबद्दल, सामाजिक चालीरीतीबद्दल बर्याच विद्वानांनी आपली वेगवेगळी मते विचार व्यक्त केलेले आहेत. आणि बंजारा समाजाबद्दल बरीचशी नवीजुनी पुस्तके उपलब्ध आहेत. काही विचारवंतांच्या मते हा समाज क्षत्रिय वंशाचा असून तो पुर्वाश्रमी राजपुत असावा त्याचे राज्यामध्ये भटकत गेली असावा असे सांगितले जाते.

काही ऐतिहासिक नोंदीवरुन हे खरे वाटत असले तरी, राजस्थानचा प्राचीन इतिहास पाहिले तर बंजारा ही जमात राजस्थानामध्ये राज्य करीत होती किंवा अस्तित्वात होती असे कुठेही आढळत नाही. काही आडनावावरुन उदा. राठोड, राठौर, पवार, चव्हाण, चौव्हाण आणि काही सामाजिक चालिरीतीवरुन हा समाज मुळचा राजस्थानचा असावा व राजपूत या जातीमधून त्याचे विभाजन झाले असावे किंवा त्याचीच एक मुळ उपजात असावी असेही तर्क काढले जाते. पंरतु बंजारा ह्या जमातीचे सामाजिक वैशिष्टय़े पाहिले तर हा स्वतंत्र बोलिभाषा बोलणारा, स्वतंत्र जातपंचायत असणारा, संपूर्ण भारत देशामध्ये एकच वेशभूषा असणारा, हा समाज कोणत्याही जातीची उपजात असावी किंवा कोणत्याही जातीमधून या समाजाचा उगम झाला असावा असे वाटत नाही. काही प्रमाणात सामाजिक चालीरीती सम प्रमाणात असू शकतात.

त्यावरुन कोणत्याही समाजाशी कोणताही समाज जोडणे हे तारीखीकदृष्टय़ा योग्य होत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्र राज्यामध्ये या समाजाला राजकीय नेतृत्व मिळाले या समाजाचे वसंतराव नाईक हे तब्बल अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पुढे त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे ही अल्प काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून होऊन गेले. या कालावधीमध्ये त्यांनी समाजाचे शैक्षणिक आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला. परंतु एका अल्पसंख्याक समाजाचे राजकीय प्रतिनिधी म्हणून त्यांना फारसा समाजाचा विकास साधला असे म्हणता येणार नाही. त्यांनी सत्ता समतोल ठेवून आपल्या समाजबांधवाना सुधारण्याचा जरुन प्रयत्न केला. परंतु हा श्रमजिवी व निरक्षर समाज असल्यामुळे त्यांना बर्याच अडचणींना सामोरे जावे लागले. कर्नाटक, आंध्र या राज्यांमध्ये काही प्रमाणात या समाजाचे राजकीय प्रतिनिधी आहे.

परंतु संपूर्ण समाजाला एक वैचारिक दिशा द्यावी किंवा समाजाच्या राजकीय, आर्थिक शैक्षणिक विकासाचा मसुदा तयार करुन समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करुन समाजाला एक नवी दृष्टी द्यावी एवढय़ा पातळीचे नेते सद्यः स्थितीमध्ये आढळून येत नाहीत. अतिशय खेकडा प्रवृत्तीचा हा समाज आजही अतिशय मागास आहे. प्रचंड बेकारी, शेतीला आधुनिकीची जोड नाही. शिक्षणाचे प्रमाण कमी, व्यापार करण्याची कसब नाही. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा अतिशय दयनीय अवस्था समाजाची आहे.

समाजाची आर्थिक उन्नती साधायची असेल, शैक्षणिक उन्नती साधायची असेल, आणि सामाजिक उंचावयाचा असेल तर एकत्र येणे आवश्यक आहे. त्यामध्ये लग्न, मेळावे घेणे, समाज मेळावा घेणे, समाजातील गुणी लोकांना साहित्यीकांना, गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना, राजकीय जागरुक सामाजिक दृष्टय़ा असणार्या पुढार्यांना एका व्यासपीठावर नेहमी बोलवून त्यांना प्रोत्साहन देणे सत्कार करणे, सामाजिक प्रवचने व मार्गदर्शन करणे व गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक आधार मिळवून देणे अशी बरीचशी सामाजिक उपक्रम राबविल्या शिवाय कोणत्याही संघटनेला व नेत्यला सामाजिक कार्यकर्त्यांला सामाजिक बळ त्यांच्यामध्ये निर्माण होणार नाही व समाजाचा विकास होणार नाही.

संस्थापक:
गोविंदराव एच. चव्हाण (वडचुनेकर)