बंजारा दिवाळी सण – भाष्कर राठोड़

बंजारा समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा विचार करताना दिवाळी या सणाचाही विचार करावा लागतो. सण, उत्सव, रुढी, परंपरा हया प्रत्येक जातीजमातीला मिळालेली सांस्कृतिक देणगी आहे. हिंदू संस्कृतीत हा सण पाच दिवसांपर्यंत साजरा केला जातो, परंतु बंजारा समाजात दिवाळी ही दोनच दिवस साजरी केली जाते. या दिवाळीला सणापेक्षा उत्सव म्हणून साजरा करतात. दिवाळीला बंजारा बोलीत “दवाळी” असा शब्द रुढ आहे.
अश्विन अमावस्येचा दिवस हा बंजाऱ्यांचा दिवाळीचा पहिला दिवस. या आश्विन आमावस्येला बंजारा बोलीत “काळीमावस” असे म्हणतात. या दिवशी तांडयातील सर्व मुली नायकाकडे जाऊन तिजेप्रमाणे दिवाळीची ओवाळणी करायची परवानगी मागतात. नायक तांडयातील रोगराई व परिस्थितीचा विचार करुनच दिवाळीच्या ओवाळणीला परवानगी देतो. तांडयावर कोणतेही संकट नसेल, तांडयात आनंदाचे वातावरण असेल तरच परवानगी मिळते. त्यानंतर मुली परवानगी मिळवून घरी परततात.
सायंकाळी रानातील गाईगुरे परतल्यानंतर गाईंना गेरु रंग लावतात आणि सजवितात. दिवे लागणीला तांडयातील सर्व लोक आपापल्या घरातील पूजेच्या दिवा लावतात त्यास “दिवो बाळणे” असे म्हणतात. त्या दिव्यात एक कलदार रुपयाचे नाणे टाकतात. या दिव्याच्या सोबत एक मातीचा दिवा लावतात त्याला “ढाकणी” असे म्हणतात. नैवेद्य दाखवून पूजा करता. घरातील सर्व नमस्कार करतात. त्यानंतर मुली ढाकणीचा दिवा घेऊन गाईगुरांच्या गोठयात जातात. गाईगुरांना ओवाळीत पारंपारिक गीत गातात.
आपल्या गाईगुरांना ओवाळून तांडयातील सर्व मुली नायकाच्या घरी ढाकणी घेऊन एकत्र जमतात. नायकाच्या घरुन ओवाळणीला सुरुवात करतात. नायक या मुलींच्या ढाकणीत (ओवाळणीच्या दिव्यात) गूळ व पैसे भेट देतो. नायकाच्या घरुन ओवाळणीला सुरुवात केल्यानंतर तांडयातील प्रत्येक घराला ओवाळण्यासाठी रात्रभर तांडयात फिरतात. या
ओवाळणीला बंजारा बोलीत “मेरा” म्हणतात. ही तांडयातील ओवाळणी बहिणीने भावाला करायची नसून ती उपास्य देवतांना करावयाची ओवाळणी म्हणजे मेरा होय. प्रत्येक घरातील लोक मुलींच्या ढाकणीत पैसे किंवा गुळाचा खडा टाकतात. रात्रभर मुली “मेरा” चे पारंपारिक गाणे म्हणतात. त्या नंतर दिवस उजाडत असतांना “छादळा कुटेरो” नावाचा विधी पार पाडला जातो. या प्रसंगी घरातील पुरुष मंडळी एका हातात सुप व दुसऱ्या हातात लाकडी फळी घेऊन वाजवत वाजवत घराला प्रदक्षिणा घालत गाणे म्हणतात. या प्रक्रियेला बंजारा बोलीत “छादळा कुटेरो” असे म्हणतात.
अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी बंजारा समाजात मृत पूर्वजांची पुजा करतात. ही मृत पूर्वजांची पूजा वर्षातून दोन वेळा केली जाते. एक होळी आणि दुसरी दिवाळीच्या दिवशी. ही पूजा धबुकार पध्दतीने केली जाते. बंजारांच्या मृत पुर्वजांच्या पूजेला “नेवसपाणी” असा शब्द रुढ आहे. मूत पूर्वजांची पुजा करीत असतांना मुली गाईची पूजा करतात. या दिवशी गाईगुरांचे शेण उकिरडयावर टाकले जात नाही.त्या शेणाचे वाडे बनवून पूजतात.याला गोधन पुजा म्हणतात.
या वाडयांना पूजण्यासाठी लागणारी झेंडूची फुले, तिकाडीचे गवत, रानफूल (लांबडी-बरुवा) आणण्यासाठी माळरानाकडे जातात. जाताना व येताना गाणी म्हणतात. त्यामुळे जवळपासचा परिसर निनादतो. या दिवशी मुली उपवास करतात. उपवास करणाऱ्या मुली पाणीसुध्दा पीत नाहीत. तिकाडी (लांबडी) घेऊन मुली घरी परततात. प्रत्येक घरासमोर शेणाचे वाडे बनवितात. त्यानंतर दीपारतीचे ताट मोठया मुलीच्या हातात दिल्या जाते. ही थाळी कासे (ब्राँझ) धातूची असते.
ही आरती घेऊन तांडयातील प्रत्येक घरासमोर केलेल्या वाडयाची पूजा करताना शेणाच्या वाडयावर गेरु पाण्यात भिजवून शिंपडतात. त्यावर हळद, कुंकू टाकतात. ताक शिंपडतात. शेणाच्या वाडयात रानफुले, तिकाडी खोवत असताना मुलींचा समूह गोदन म्हणतात
त्याचप्रमाणे गाईगुरांच्या दावणीचीही पूजा करतात. “गोदन” पूजेत व गाईगुरांच्या दावणीच्या पूजेच्या विधीत काही फरक नसतो. या दावणीच्या पूजेप्रसंगी गाणे म्हणतात.
अशा प्रकारे तांडयातील सर्वांच्या घरासमोरील “गोदनाची” पूजा केल्याशिवाय मुली आपपल्या घरी परत जात नाहीत. या गोदन पुजेचा घरातील पूजेशी काहीही संबंध नसतो.
बंजारा समाजात “कर” पाळण्याची प्रथा आहे. प्रत्येक सणाच्या दिवशी सामूहिकपणे बोकड घेऊन कापतात व त्याचे समसमान वाटे करुन घरोघरी वाटण्यात येतात. या प्रक्रियेला बंजारा बोलीभाषेत ” कर” असे म्हणतात.             जय सेवालाल                भास्कर राठोड सवयमसेवक गोर बंजारा संघर्ष समिती तथा भा.ब.क.से.स.ठाणे संघटन सचिव 8108024332

Leave a Reply