तीज उत्सव 

तीज उत्सव म्हणजे बंजारा स्त्र्यियांचा व मुलीचा आवडता उत्सव होय पावसाळयातील श्रावण महिना साजरा करण्यात येतो . पूर्वी पावसाळयात “लदेणी” होत नव्हती. बंजारा समाज एका ठिकाणी स्थिरावल्यानंतर या काळात लग्नकार्य करीत असत. लदेणी काळात दोन तांडे पावसाळयानंतर विखुरल्या गेले की, पुन्हा भेटीची शक्यता फारच कमी असायची. तेव्हा आषाढ महिना संपल्यानंतर श्रावण महिन्यात लग्न झालेल्या मुली माहेरी येत असत. या वेळी हा “तिज” उत्सव साजरा करण्यात येतो. लग्न झालेल्या मुलींना दुःख होई. या दुःखाचा विसर पडावा म्हणून “तिज” उत्सव साजरा करीत.
तीज उत्सव हा प्रामुख्याने तांडयातील मुलींचा मानला जातो. या उत्सवात स्त्रिया नाचगाण्यात भाग घेतात. असे असले तरी लग्नास योग्य किंवा उपवर मुलींचा गट या उत्सवाप्रसंगी प्रभावी ठरतो. श्रावण महिना लागताच बंजारा तरुणी रानोमाळ विविध लोकगीते गायला सुरुवात करतात. मनातला आनंद व्यक्त करण्यासाठी उत्साहाने सतत गायिल्या जाणाऱ्या गाण्यांमुळे तांडया-तांडयांत वेगळे वातावरण निर्माण होते. नाचगाणे हा बंजारा स्त्रियांचा जीवनधर्म आहे. तीज उत्सव हा अविवाहित मुलींचा सर्वांत प्रिय उत्सव आहे.

आदिवासी समाजात असे दिसून येते की, कोणताही उत्सव आपल्या समूहाच्या प्रमुख नायकाच्या परवानगीशिवाय साजरा केला जात नाही. बंजारा समाजातील अविवाहित मुलींचा समूह नायकाच्या घरी जमा होतो. नायका समोर तीज उत्सव साजरा करण्याविषयी प्रस्ताव मांडतात, लाडीगोडी लावतात. गीत गात नाचतात. मुलींचे म्हणणे ऐकून घेतल्यावर नायक तत्कालीन परिस्थितीचा विचार करतो. तांडयातील रोगराईची माहिती मिळवतो. तसेच कारभारी आणि तांडयातील वडीलधाऱ्या मंडळींचा सल्लाही घेतो. सल्लामसलत -ााल्यानंतर तांडा नायक तीज उत्सवाला तांडयाचा नायक या नात्याने मंजुरी देतो.

तीज उत्सवाला नायकाने परवानगी दिल्यानंतर तरुणींच्या मनातला आनंद व्दिगगुणित होतो. नाचगाण्याचे फेर धरत नृत्याला रंग चढत असताना तांडयातील स्त्रिया अविवाहित मुलींना पुढे करुन तीजनृत्यात सामील होऊन नाचगाण्याला सुरुवात करतात. त्यासुध्दा मागे राहत नाहीत. अविरत नृत्याला सुरुवात होते. श्रावण महिन्यातील अंधाऱ्या रात्री तांडा गीत-नृत्याच्या तालासुराने गजबजून जातो.

“तीज” उत्सव साजरा करण्याची परंपरा राजस्थानी, मारवाडी, गुजराथी इत्यादी जातीजमातींत मोठया प्रमाणात असली तरी बंजारा समाज तीज उत्सव आपल्या पध्दतीने साजरा करतात.

तीज उत्सव साजरा करण्याचा दिवस नायकाने निश्चित केल्यानंतर श्रावण महिन्यातील नायकाने ठरविलेल्या दिवसापासून नऊ किंवा अकरा दिवसांत साजरा करायचा असतो. त्यामुळे तिजेच्या संबंधित आवश्यक असणाऱ्या वस्तूंची जमवाजमव केली जाते. सर्वप्रथम अविवाहित मुलीसाठी गहू पेरण्यासाठी बंाबूची दुरडी आणली जाते. जर घरात अविवाहित मुलगी नसेल तर नातेवाईकांच्या मुलीसाठी दुरडी आणली जाते आणि तशी सूचनाही दिली जाते. दुरडी आणल्यानंतर त्या दुरडीला लोकरीच्या धाग्यांचे गोंडे तयार करुन सुशोभित केली जाते.

तीज पेरण्याच्या ठरलेल्या आदल्या दिवशी सायंकाळी तांडयातील सर्व मुली एकत्र जमतात आणि नृत्य करीत नायकाच्या घरी जातात. नायकाची बायको गहू पाण्यात भिजू घालताना मुलींसोबत नृत्य करते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीज पेरायची असते. तेव्हा शिवारातील वारुळमाती आणण्यासाठी जातात. जाताना अनेक गीते गातात. वारुळाची माती बहुतेक बोराच्या झाडाखाली तयार होते. या मातीने गव्हाचे रोपटे वेगाने वाढते. ही माती जमा करण्यापूर्वी मुली हरभऱ्याचे भिजवलेले दाणे बोरीच्या काटयात खोवतात आणि झाडाला प्रदक्षिणा घालतात याला “बोर झुडेर” असा शब्दप्रयोग बंजारा बोलीभाषेत आहे. या प्रसंगी पारंपारिक गीते गातात.

या माती आणण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पुढेपुढे मुलांचाही एक गट असतो. मुलेही मुलींसोबत स्पर्धा करतात. मुलींना गूढ कोडयात अडकवतात. ज्या मुलींचा विवाह पुढच्या वर्षी होणार आहे, अशा मुली तीज पेरल्यानंतर तांडा सोडून जातील म्हणून त्यांना अधिक मान असतो. मुले मुलींच्या रस्त्यात आडकाठी आणतात. मुली बोराच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालतात. म्हणून मुलींचा पहिला नवरा बोरांचे झाड म्हणून चिडवितात. या वेळी लोक तरुण मुलांना पाठिंबा देतात आणि मुले मुलींना पारंपारिक कोडयात अडकवतात. 
मुलगा (कोडे):- “वाट बांधू घाट बांधू बांदी चारी देसा, पगे पगेमा

दामळीं बांधू जाईस कुळंसे देसा?”

भावार्थः- मी तुझी वाट बांधली, घाट बांधली,चार दिशाही बांधल्या.

एवढेच नाही तर तुझे पायही बांधले. मग तू कोणत्या

दिशेला जाशील?

मुलगीः- “घाट छोडू, वाट छोडू, छोडू चारी देसा

झारी सदा बेडलो छोडू, जाऊ बापुरे देसा”

भावार्थः- तू बांधलेली वाट, घाट, चार दिशा मी सोडवते. पाण्याचे

भांडयावर भांडे असलेले (कळशी,घागर) झारी सोडवून

मी मा-या बापाच्या देशाला जाते.

अशा प्रकारे मुले मुलींना आणखी गूढ कोडयात

अडकविण्याचा प्रयत्न करतात.

मुलगा (कोडे):- “छो हातेर दोल्डी ये बार हातेर आगेल्डी

ये वातेर आरत केद पच पेरे दियू ओल्डी”

भावार्थः- सहा हातांची दोल्डी (दुरडी) बारा हातांची आगेल्डी

म्हणजे काय? या गोष्टीचे उत्तर दिल्यावरच मी तुला

दुरडीत तीज (गहू) पेरु देईन.
अशा कोडयाचे उत्तर मुली काव्यरुपाने सोडवितात. जर कोडयाचे उत्तर सांगता आले नाही तर मुली गाण्यातून मुलांना विनवणी करतात. त्या मुली मुलांच्या संमती शिवाय मुली पुढे जावु शकत नाहीत. कोडे सोडवले नाही तर

-ााडासाठी आणलेले पाणी सर्व मुलींना सांडावे लागते परत पाणी भरुन आणवे लागते त्यानंतर खऱ्या तीज उत्सवाला प्रारंभ होतो. माती घेऊन आलेल्या मुली नायकाच्या घरी येतात. माती आपल्या दुरडीत टाकून नायकाच्या बायकोने भिजू घातलेले गहू पेरतात. या बरोबर पळसाच्या पानांचे द्रोण करुन त्यात माती भरुन त्यातही गहू पेरतात. या प्रसंगी नायकाच्या घरासमोर नाचगाणे होते. या तीज उत्सवाप्रसंगी ज्या कुटुंबात मुलगी नसते त्या कुटुंबात उत्सवाकरिता जवळच्या नातेवाईकांची मुलगी आणली जाते. तिची दुरडी पेरतात. तील पेरल्यानंतर मुली उत्साही होतात. गाणे म्हणायला सुरुवात होते. रात्रभर नृत्य करुनही मुलींना थकवा जाणवत नाही.

त्या नंतर तीज पेरलेल्या दुरडीमधील रोपांसाठी सकाळी व संध्याकाळी नियमितपणे पाणी शिंपडतात. हे त्यांचे नित्यकर्म होऊन जाते. पाणी आणण्यासाठी मुलींच्या झुंडी नदी, नाला किंवा विहिरीवर जातात. जाता-येताना गाणी गातात. यावेळी मुले मुलींची वाट अडवतात. मुला-मुलींमध्ये सवाल-जवाब होतो. याचा आनंद तांडयातील लोक घेतात. ते काही सवाल-जबाब पुढीलप्रमाणे.

मुलगा (सवाल):-“काळो कुंडो कचन भरो हेल्दा रुंदी वाट, कुंवारी छोरी

कुकर पकडू तारो हात”

भावार्थः- पाण्याचा काळा डोह भरुन वाहातो आहे. पाणी भरण्याची

वाट अरुंद आहे. तू विवाहित (कुंवारी) आहेस, तुझा हात

कसा धरु सांग?

मुलगी(जबाब):- “हास घालू हासली, खेचन बांधू आटी भरे सभामां लाथ

मारु, म जातेरी बेटी”

भावार्थः- मी गळयात हासली (गळयात अलंकार) घातली आहे.

डोक्यावर आटी (दागिना) मजबूत बांधीन, भरलेल्या सभेत

लाथ मारीन, मी खानदानी जातीची मुलगी आहे.

तू माझा हात कसा धरतोस?

मुलगा (सवाल):- “डगमग डागळो गोरी राके खेत

मुठीभर हुल्डा दये तारो घणोच पाकीये खेत.”

भावार्थः- शेतातला राखण करावयाचा मांडव डगमग करतो आहे.

तू शेताची राखण करतेस, तू मला मूठभर हुरडा दे!

हुरडा दिला तर तु-या जीवनाचे शेत भरुन येईल, भरपूर

पीक होईल.

मुलगी(जबाब):- “काचो सरा कचकच लागे, नख लागे जीव जाय

घरदणी कोनी खादो, परदेशी कुं खाय”

भावार्थः- कणीस कच्चे आहे. हुरडा भरलेला नाही. नाजूक आहे.

नख लागले तर जीव जाईल, घरधन्यानेच खाल्ला नाही

तर परदेशी कसा खाईल?

अशा प्रकारे मुली पाणी आणताना सवाल-जबाब करतातःगाणे म्हणतात आणि दुरडीत पेरलेल्या “तीज” ला सामूहिकपणे पाणी घालताना गाणे म्हणतात. ही तीज (पेरलेली दुरडी) पवित्र ठिकाणी ठेवल्या जाते. तिचा सांभाळही केला जातो.

बंजारा समाजात असा लोकविश्वास आहे की, जेवढया जोमाने रोपटयाची वाढ होते, तवढयाच जोमाने तांडयाची भरभराट होते, समृध्दी नांदते. म्हणून अविवाहित मुली “तिज”चा सांभाळ करीत असतात. कोणत्याही परिस्थितीत त्या रोपटयावर विघ्न येऊ देत नाहीत. हा मुलींच्या प्रतिष्ठेचा विषय असतो. मुली तीजचे स्वास्थ्य बिघडू नये म्हणून त्यांच्याविषयी गीतातून मनःकामना व्यक्त करतात.

या उत्सवाच्या कालावधीत उंच उंच झोपाळे बांधून, झोपाळयावर अनेक धार्मिक कथा-गीते गायिली जातात. मग रात्रंदिवस नृत्यगायनाला रंग चढतो. तीज विसर्जनारच्या अगोदरच्या दिवशी “ढंबोळी”चा कार्यक्रम असतो. या दिवशी सर्वांनी गोडधोड करुन “तिज”ला नैवेद्य दाखवून पूजा करायची असते. ढंबोळी हा गव्हाच्या पिठापासून तयार केलेला मुटकुळयासारखा पदार्थ “तिज”ला अर्पण करतात. तसेच या दिवशी मुली उपवास करतात आणि आपल्या बाहेरगावच्या मैत्रिणींना बोलावून जेवण देतात.

त्यानंतर सायंकाळी सर्व मुली एकत्र जमतात आणि चिखलाच्या दोन मूर्ती तयार करतात. याला “गणगोर” असे म्हणतात. मोठी मूर्ती महादेवाची असते, तर लहान मूर्ती पार्वतीची असते. या गणगोरींची स्थापना करुन मुली त्यांची मनोभावे नारळ फोडून, गुळाचा प्रसाद दाखवून पूजा करतात आणि हा नारळ व गुळाचा प्रसाद मुली घरोघरी वाटतात. यालाच “ढंबोळी” असे म्हणतात.

रात्री आपसांतील लोकांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. घरातील सर्व मंडळी जेवणापूर्वी तिजेला नमस्कार करतात. आमंत्रित असलेली व्यक्ती तिजेला पैसे व मुलीला शक्य असल्यास कपडे आहेर करते. मुली जेवणानंतर गणगोरजवळ नृत्याचा फेर धरतात, गातात.

या प्रसंगी तांडयातील नायक प्रमुख मुलाची निवड करतो. तसेच मुलींमधून एका मुलीची निवड केली जाते. यात प्रमुख मुलाच्या गटातील एक सवंगडी एका हातात गवताचा “दोना” (द्रोण) घेऊन मुलींच्या मध्यभागी उभा होतो व हा गवताचा “दोना” मुलींनी मिळवायचा असतो. मुली त्याच्याभोवती फेर धरुन नाचतात, गातात. मुलेही मुलींना गाण्यातून चिडवतात. शेवटी मुली गोंधळ घालून “दोना” हस्तगत करतात. तसेच शेवटी एक तरुण पाटी घेऊन उभा राहतो. ही पाटीही मुलींना हस्तगत करावयाची असते. रात्रभर मुले-मुली (खेळून) थकून जातात आणि ही पाटी हस्तगत करतात. या पाटीला “पिडीया” असे म्हणतात. अशा प्रकारे नृत्य-गायन, खेळात दिवस उजाडण्याची वेळ येऊन ठेपते. तो दिवस म्हणजे तीज विसर्जनाचा दिवस असतो.

या दिवशी मुली आपापल्या तिजेची दुरडी घेऊन घरोघरी फिरतात नृत्य करतात. शेवटी संपूर्ण तांडा नायकाच्या घरासमोर जमा होतो. त्या नंतर सर्वात मोठी असलेली मुलगी आपल्या तिजेची दुरडी नायकासमोर ठेवते. नायक त्या तिजेच्या दुरडीला नमस्कार करतो. एक-दोन रुपये आहेर ठेवतो आणि भारावलेल्या मनाने “आवो तीज तोडा” “या तीज (गहू) खुडू” असे म्हणतो. नायक तीज तोडून इतरांना भेट देतो व आपल्या पगडीमध्ये तिजेचा (गहूचा)तुरा खोवतो. त्यानंतर सर्वांना तीज तोडायला अनुमती मिळते.सर्व मुली आपआपली तिज खुडतात आणि इतरांना भेट म्हणून देतात. ती तिज कोणी आपल्या गळयात, कोणी आपल्या हातात बांधतात.त्यानंतर तीज विसर्जनासाठी तांडयातील लोक नदीकडे निघतात, तेव्हा मुली (तीज) आपली मैत्रीण चालली म्हणून रडतात व तिला निरोप देताना गाणी गातात.

या प्रमाणे भरावलेल्या मनाने तांडयातील सर्व लोक नदीवर येतात. “तीज” ची दुरडी आणि “गणगोर” यांना नदीच्या प्रवाहात विसर्जित करतात. मुली मोठमोठयाने रडतात. स्त्रिया आपल्या ओढणीचा पदर हातात घेऊन पदराने निरोप देतात. तीज नदीच्या प्रवाहात दूरदूर जात असते. त्या प्रसंगी निरोप देतांना
वेती जा ये वेती जा ।

जा मारी सातण वेता जा ।।

झाडीन देखन याढी केस ।

दातण देखण सातण जा।।

वेती जा मारी सातण वेती जा ।
अशी प्रकाचरे गीत म्हटले जाते. अशा प्रकारे तीजोत्सवाचा शेवट केला जातो.

Banjara Live
www.goarbanjara.com

गजानन धावजी राठोड 

प्रमुख प्रतिनिधि – बंजारा न्यूज ऑनलाइन पोर्टल 

Leave a Reply