गोरबोली, संस्कृती जपायची असेल तर बंजारा भाषांकडे लक्ष हवे

महाराष्ट्रात बंजारा समाज फार मोठय़ा प्रमाणात विखुरलेला आहे. त्यांची एक वेगळी भाषा आहे. संस्कृती आहे, वेषभूषा आहे. या विखुरलेल्या बंजारा समाजात बंजारी, लमाण, धाडी, मथुरा वंजारी इत्यादी भाषा बोलल्या जातात. या भाषा जतन करावयाच्या असतील तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेषतः शिक्षण खात्याने त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. बंजारा समाज त्यांची भाषा गोरबोली, संस्कृती जपायची असेल तर भाषा हेच माध्यम महत्त्वाचे आहे. संपूर्ण भारतात अनेक जाती जमातीचे लोक राहतात. परंतु त्यांच्या भाषेवरुन त्यांना ओळखण्यास अडचण निर्माण होते. परंतु कुठलेही दोन बंजारा व्यक्ती एकत्र आले आणि त्यांनी गोरबोली भाषेमध्ये संवाद सुरु केला की लगेच जवळीक निर्माण होते आणि आपणोछ मणक्या छ ! असा सूर निघतो. शिक्षण घेतलेले बंजारा बांधव स्वतःची मूळ भाषा बोलण्यास कचरतात. हा थोडा पुढारलेला बंजारा मागे पडलेल्या अन्य बंजारा बांधवांपेक्षा स्वतःला वेगळे समजू लागतो. आपली मूळ भाषा बोलण्यास त्यांनी कमीपणा वाटतो. पंधराव्या शतकात वेगवेगळ्या समाजाच्या सुमारे पंधरा हजार बोली भाषा होत्या. परंतु त्यातील बर्याचशा भाषा नामशेष झालेल्या आहेत. आज 6800 भाषा संस्कृतीला धरुन आहेत. आजही बंजारा समाज शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. खंडप्राय भारताचा मूळ निवासी व जगातील जवळजवळ 12 ते 17 देशांमध्ये वास्तव्य करणारा बंजारा बांधव असो की रोमा जिप्सी बंजारा असो, आजही विविध समस्यांना तोंड देत हलाकीचे जीवन जगत आहे.

मुठभर बंजारा बांधव शिकले, सुधारले सुखी झाले म्हणजेच सर्वच बंजारा बांधव शिकले, सुधारले असा होत नाही. आजही अनंत संकटांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. जसे 498 च्या खोटय़ा केसेस, हुंडाप्रथा, तेरवी प्रथा, बोकड बळी, लग्नात अवास्तव होणारा खर्च त्यामुळे त्यांच्या बाबतीत आपल्या मनात तळमळ असायला हवी. कुपोषणाने अनेक मुले मृत्यूच्या दाढेत आहेत तर दारुपायी मजुरी करणारा बंजारा बांधव मजुरीची अर्धी रक्कम तो दारुभट्टीवर ठेवून जातो. त्यामुळे त्यांच्या कुटूंबाला पोटभर खाणे सुद्धा मिळत नाही. कितीतरी बंजारा बांधव आजही बेघर आहेत. अन्न, वत्र, निवारा व शिक्षण या आवश्यक गरजांची पूर्तता होत नाही. विमुक्त जाती, भटक्या जमाती आश्रम शाळा म्हणजे काही लोकांसाठी चरण्याचे कुरण झाले आहे. घरी खायला मिळत नाही म्हणून विमुक्त जाती आश्रमशाळेत मुलांना घातले जाते. अशा स्थितीत शिक्षणाच विचार मनात तरी येत असेल का ? आज 400 आश्रम शाळा आहेत मात्र परिणाम शून्य ! देशातील बंजारांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने विशेष मोहीम हाती घेवून आयोगाची स्थापना करण्यात आली होती. परंतु आघाडीचे शासन केंद्रात आल्यानंतर त्या आयोगाला स्थगिती देण्यात आली.

आज देशात 7 कोटी बंजारा समाज आहे. बंजारा नायक हरीभाऊ राठोड यांच्या प्रयत्नाने आंध्रप्रदेशातील सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या नेतृत्वात एक समिती काम करणार होती. त्यात बंजारा समाजाला समाज संघटनात्मक सवलती व बंजारा समाजाला एकच अनुसूचीमध्ये समाविष्ट करणे अशा उद्दीष्टांचा समावेश आहे. बंजारा समाजातील मुलांना थेट मराठी पाठय़पुस्तकाद्वारे शिकविण्यापेक्षा बोलीभाषेवरुन (मातृभाषेतून) मराठीकडे आणण्याची कल्पना प्रथम 1975 मध्ये विचारात घेतली होती. परंतू 30 वर्षे झाली तरीस बंजारा भाषेत पाठय़पुस्तके तयार झालेली नाहीत. बंजारा मुलांशी सुसंवाद साधणारी पुस्तके हवीत, नाहीतर बंजारा मुले घरात बाबा अंगार चुटल । बाबा छळी आणायला जावू का ? असा संवाद साधतात. धड मराठीही नाही अन् धड बंजारीही नाही. त्यामुळे विज्ञान युगाकडे झेप घेणारी पुस्तके हवी आहेत. घरात इंग्रजीचे वातावरण नसतांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावे लागणार्या मुलांचे जसे हाल होतात तसेच हाल बंजारा मुलांचे मराठी शिकतांना होत असतात.

संस्थापक गोविंदराव एच. चव्हाण (वडचुनेकर)

Leave a Reply