गोरबोली भाषेचे अस्तित्व धोक्यात – भीमणीपुत्र मोहन नाईक

*गोरबोली भाषेचे अस्तित्व धोक्यात*- *भीमणीपुत्र*

सारखानी- (11.5.018 ) भाषावार प्रांत निर्मितीमुळे गोरबोली भाषेचे मूळ अस्तित्व आज धोक्यात आलेले असून गोरबोली भाषेचे सामाजिक भाषाशास्त्र म्हणजेच भाषा विज्ञान भ्रष्ट होण्याच्या मार्गावर आहे.याची कुणालाही खंत नाही. भारतातील 23 विद्यापीठात भाषाविज्ञान व भाषा अध्ययन विभाग असून;मरण यातना भोगण्यार्या अशा भाषांना आपल्या कवेत घेऊन अशा भाषांचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी अशी विद्यापीठे स्विकारतात.गोरबोली भाषिक बहुल असलेल्या क्षेत्रातील विद्यापीठांनी गोरबोली भाषेला आपल्या कवेत घेऊन गोरबोली भाषेचे रक्षण आणि संवर्धन करावे अशी मागणी भीमणीपुत्र मोहन नाईकांनी मौ.पार्डी ता.माहुर येथे पोलिस निरीक्षक c.i.d धरमपुत राहुल सिंधू पालतीया यांचे *तांडो* या कविता संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी आपल्या भाषणातून केली.
भाषा निर्मितीच्या प्रवासातील “गीद”हा गोरबोली भाषेतील गद्य प्रकार प्राचीन काळातील भाषेचे एक रूप असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाल्याचेही ते म्हणाले.गद म्हणजे बोलणे या धातू पासून गीद या गद्य वाड;मय प्रकाराची निर्मिती झाली असून लेखन कला अस्तित्वात येण्यापूर्वी आपला इतिहास,संस्कृती,लोकजीवन मौखिक परंपरेने जतन करण्याची प्राचीन काळी एक पद्धत होती,”गीद”हे त्याच परंपरेचे अवशेष आहे.
प्रसिद्ध भाषायज्ञ लुंडविंग न्वार यांनी आपल्या *श्रमपरिहार* Yohe yo या सिद्धांतातून ‘गाण्यातून भाषा जन्मास आली असल्याचे स्पष्ट केले आहे’ (भाषाशास्त्र- प्रा.आनंद भंडारे ) या सिद्धांताच्या आधारे गोरबोली भाषा व्यवहारातील ‘गीद’हे गोरबोली भाषेचा जन्म सिद्धांत ठरत असल्याचे सिद्ध होते.गोरबोली भाषा ही आदिम बोलीभाषा असून तिला घटनात्मक संरक्षण नसल्यामुळे गोरबोली भाषेचे मूळ अस्तित्व,सामाजिक भाषाशास्त्र धोक्यात आले आहे,ही परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात गोरबोली आपल्या मूळ अस्तित्वासह जगणार नाही.अशी चिंताही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त खेली.
गोरबोली भाषेच्या अस्तित्वाची स्वतंत्र ओळख नष्ट होऊ नये या साठी ना.संजयभाऊ राठोड महसूल राज्य मंत्री महाराष्ट्र यांनी गोरबोली भाषेस आपल्या कवेत घेण्या संबंधी विद्यापीठांना विनंती करावी.अशा आशयाचे भीमणीपुत्राने एक निवेदनही त्यांना पाठवले आहे.भीमणीपुत्र हे नुकतेच डोंबिवली येथे संपन्न झालेल्या 5 वे अ.भा. गोर बंजारा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते.त्यांनी आपल्या संमेलनाध्यक्षीय भाषणातून गोरबोली भाषेला घटनात्मक दर्जा मिळावा अशी मागणीही केलेली आहे.

प्रमुख प्रतिनिधी: रविराज एस. पवार

Leave a Reply