गोरबोली: एक चिंता,एक चिंतन:- भिमणी पुत्र,मोहन नायक,बंजारा वरिष्ठ साहित्यकार,

!! गोरबोली: एक चिंता,एक चिंतन!!

गोर बोलीभाषा पिढ्यांनं पिढ्यापासुन प्रवाहित होत आली आहे.कालौघात स्वतःची लिपी नसल्यामुळे देवनागरी लिपीतील तिचे ठराविक स्वरुप निश्चित झाले आहे.
गोरबोली बोलणा-या गोरबंजारा समाजात आपल्या बोलीभाषेविषयी कमालीची अनास्था आहे.आपण आपल्या भाषेचा गांभीर्यानेि विचारच करणे सोडुन दिले आहे.हेच मुख्यत्वे आजचे आपले व गोर बोली भाषेविषयीचे चिंतेचे कारण आहे.
गोरबोलीला हजारो वर्षाची ऐतिहासिक परंपरा आणि समृद्ध वारसा आहे.ती जगातील सर्वात आदिम अशा सिंधू संस्कृतीशी नाते जोडुन तिचे अवशेष अंगाखांद्यावर घेऊन आजही जगते आहे. सिंधू संस्कृतीच्या पतनानंतर तेथील वारसा सांगत बंजारा समाजाची गोरबोली नंतरच्या काळात भटक्या जीवनअवस्थेत वावरणा-या गोर समाजाची लोकभाषा असल्याने, ज्या ज्या परिसरातुन त्याना मार्गक्रमण आपल्या आजीविकेसाठी करावा लागला, तेव्हा त्याना तेथील भाषा एकतर शिकावी लागली किंवा त्या भाषेतील दैनदिन व्यवहारासाठी आवश्यक शब्दाना आपल्या गोरबोलीत,भाषेत स्थान देऊन, समाविष्ट करुन घेत एक अरिहार्यताम्हणुन ते आत्मसात करावे लागले, काळाच्या ओघात आपल्या बोलीत नविन शब्दाना समाविष्ट करावे लागले.त्यामुळे या गोरबीलीचे पुरातन मुळ स्वरुप, शुद्धता टिकून ठेवता आली नाही.पर्यायी शब्दाची, नवनव्या शब्दाची सातत्याने भर पडत गेली.दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास गोरबीली बदलत्या काळाबरोबर अधिक समृद्ध होत गेली, हा तिचे आजचे बदललेले विकसित स्वरुप पाहता सांगता येईल.कोणतीही भाषा वा भाषेतून येणारे भाषिक ज्ञान हा सतत वर्धिष्णू आणि विस्तारक्षम असावा लागतो.तरच तो समकालीन आणि अद्ययावत होऊ शकतो.आजच्या गोरबीलीच्या अवस्थेबद्दल बोलायचे झाल्यास, गोरबीलीचे पूर्वीचे समाजातील स्थान आणि लोकव्यवहारात मिळत गेलेला मान, आज टिकविणे हे तर फारच जिकरीचे सोबतच आव्हानात्मक झाले असुन तिचे पुर्वीचे वैभवशाली वर्धीत स्वरुप टिकवितांना पुरती दमछाक होतांना दिसत आहे. आजची गोरबीलीची अवस्था पाहु जाता गोरबोली शहरीभागात नोकरी वा काही कारणाने वास्तव्यास असणा-या व गोरबोली बोलणा-या बंजारा भाषीकामधुन नामषेश होण्याच्या मार्गावर असुन, तांड्यात सुद्धा ती गटांगळ्या खाताना, बाह्य भाषाचे सततचे आक्रमण झेलत कशीतरी तग धरुन आहे.मात्र,एकंदरीत पाहू जाता गोरबोलीचे अस्तित्व हे समाज- बांधवाच्या आणि विशेषत्वाने गोरबोली बोलणा-याच्या इच्छेवर अवलंबून राहणार आहे. येणा-या काळात आपली मायबोली-गोरबोली टिकवुन ठेवण्यात समाजबांधव कोणती भुमिका बजावतात यावर सारे तिचे भवितव्य निर्भर आहे.
जगातील इतर बोलीभाषा आज जगाच्या पाठीवरून नामशेष होण्याच्या वा होतं असल्याचे भाषाशास्त्रीनी धोक्याचा इसारा दिला असुन बोलीभाषा प्रेमीनी आपआपल्या भाषेबाबत भविष्यातील धोके लक्षात घेऊन आजच सावध राहण्याचे लक्षात आणुन दिले आहे, ते उगीच नाही? जगातील आपल्या सारख्या बोली भाषेची मरणकळा पाहताना आपली गोरबोली जगाच्या नकाशावरुन नामशेष होते की, आपला भाषीक असणारा गौरवशाली वारसा जपत टिकून राहते किंवा कसे, हे पाहणे मुळात औत्सुक्याचे ठरणार आहे.जो समाज आपल्या भाषेपासुन दुरावतो, तो आपल्या संस्कृतीपासुन तुटतो,असा भाषेपासुन दुरावलेला समाज आपले अस्तित्व आपल्या हातानी संपवितो,सोबतच तो नष्ट होतो, हा इतिहास आहे.
यासाठी जर आपली बोलीभाषा टिकवायची असेल तर या लोकबोलीत, गोरबोलीत मोठ्याप्रमाणात साहित्याची निर्मिती झाली पाहिजे, नव्हे ते आज करणे फार गरजेचे झाले आहे.परंतु खेदाची बाब ही आहे कि, हे सारे समजुनही आजच्या पिढीचे गोरबंजारा लेखक, ( काही सन्माननीय अपवाद आहेत) कवी, साहित्यिक मोठ्याप्रमाणात आपल्या गोरबोलीतुन लेखन करतांना, अभिव्यक्त होताना आजही दिसत नाहीत. याचे गांर्भियच त्यांना कळाले नाहीवकी काय? हे कशाचे लक्षण समजावे?
तेव्हा आताही वेळ गेलेली नाही. गोरबंजारा समाजात गोरबोलीसोडुन अन्य भाषेत बरेच प्रतिथयश विचारवूत,लेखक, कवी, साहित्यिक चिंतनशील, वाचणीय लेखन करतांना दिसतात. त्यानी जर इतर भाषेचे व्यासपीठ न वापरता आपल्या बोली- भाषेपासुन लेखन केले, तर ते गोरबोलीचे आपल्या मायबोलीचा पांग फेडल्यासारखे निश्चितच होईल.नव्हे ती आपली गोरबोली टिकवुन ठेवण्यासाठी मोलाचे योगदान दिल्यासारखे होईल.आणि याची दखल येणारी पिढी नक्कीच घेईल. असे लेखन गोरबोलीतुन आपल्या हातुन घडले, तर गोरबोलीभाषेचा इतिहास लिहिताना येणारा काळ आपण दिलेल्या गोरबोलीतील लेखनाची, योगदानाची दखल निश्चित घेतल्याशिवाय राहणार नाही.आपल्या उल्लेखाशिवाय ते पुर्ण होऊच शकणार नाही, एवढे मात्र नक्की. नव्हे तर गोरबोली टिकवायची, तगवायची नि वाढवायची असेल तर गोरबोलीतुन लिखाण करने ही काळाची गरज आहे. तरच आपण आपली मायबोली- गोरबोली टिकवुन ठेऊ शकू; नाहीतर आपली गोरबोली संपली,भाषा संपली की भाषेबरोबर येणारे वा बोलीभाषेतून केले जाणारे गोर संस्कार संपतील,गोरसंस्कार संपले की गोर समाज संपेल,आणि समाज संपला की आपली गोर संस्कृती संपेल, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज भासणारा नाही.हे सारे आपल्या डोळ्यादेखत घडु द्यायचे नसेल तर वेळीच समाजातील सर्व बुद्धीजीवीनी सावध झालेले बरे.
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा झपाटा पाहला की वाटते तो सा-या प्रादेशीक भाषाच्या मुळावर येणारा आहे.या भयशंकेने सा-यांनी चिंतीत होऊन चिंतन करण्याची गरज आहे. ज्याना ज्याना आपली बोली, भाषा जीवंत राहावी असा वाटते, अशा सा-यानीच बोलीभाषेसमोर उभ्या ठाकणा-या या आवाहनाचा मुकाबला करण्यासाठी चिंतन, मनन करणे व आपली भाषा म्हणजेच आपले समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सगळ्यांनी आजपासुनच पडेल तो त्याग व योगदानाची भुमिका घेतली पाहिजे. तसेच आपल्या बोली- भाषेवर येणारे भविष्यातील आव्हानाचा मुकाबला आपण कोणत्या विचाराने आणि आयुधाने करतो यावर आपले आणि आपल्या गोरबोलीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. हे बोलीभाषेसमोर उभे ठाकलेले आव्हान परतवून लावण्याचे एकच सशक्त माध्यम म्हणजे समाजातील सगळ्या प्रथितयश लेखक, कवी, साहित्यिक यानी आपल्या बोलीभाषेपासुनच यापुढे लेखन केले पाहिजे,तरच ते गोरबोलीचे आपल्या मायबोलीच्या शतकाचे पांग फेडल्याचे सार्थक होईल व प्रयत्न सार्थकी लागण्याचे पुण्य आपल्या पदरी पडेल, एवढे मात्र नक्की. सोबतच आपल्या घरात गोर बोलीला मानाचे स्थान देणे,गोरबोलीत आपण बोलणे व आपल्याना गोरबोली येईल एवडे बघणे से आपल्याच हातात आहे; हे कोण नाकारेल? बघुयात..काय करतात ते….नामा नायक

सौजन्य: गोर कैलास डी राठोड

गोर बंजारा आॅनलाईन न्यूज़ पोर्टल मुंबई महाराष्ट्र,