गोरबोलीचे संवर्धन व रक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठाच्या भाषाविज्ञान आणि अध्ययन विभागात गोरबोलीचा समावेश व्हावा..* *(गोरबोलीवर विद्यापीठीय संशोधन व्हावे यावर प्रकाश टाकनारा लेख)* लेखक- *प्रा. दिनेश सेवा राठोड* कोहळा तांडा ता.दारव्हा जि.यवतमाळ [email protected]

*गोरबोलीचे संवर्धन व रक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठाच्या भाषाविज्ञान आणि अध्ययन विभागात गोरबोलीचा समावेश व्हावा..*

*(गोरबोलीवर विद्यापीठीय संशोधन व्हावे यावर प्रकाश टाकनारा लेख)*
लेखक- *प्रा. दिनेश सेवा राठोड*
कोहळा तांडा ता.दारव्हा जि.यवतमाळ
[email protected]

आज जसे महाराष्ट्र, गोवा सहित अनेक प्रमुख विद्यापीठांतील मराठी विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागात मराठी व इतर भाषेच्या विकास, संवर्धनाबाबत आज मोठ्या प्रमाणात संशोधनाबाबत चिकित्सक शोध कार्य केल्या जात आहे. भाषा, बोलीभाषा आणि भाषेतले शब्द पहिल्यांदा कानी पडतात, ते आईच्या मुखातून म्हणून ती मातृभाषा. या मातृभाषेचं खऱ्या अर्थाने शास्त्रशुद्ध जतन-संवर्धन होतं, ते शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून. विद्यापीठे ही भाषेची राखणदार आणि पालकही आसतात. या पालकांनी भाषाशास्त्राच्या अंगाने तिचं रक्षण करण्याबरोबरच सातत्यपूर्ण शोध घेण्यावर आणि संशोधन करण्यावर तिचं भवितव्य अवलंबून असते. म्हणजेच, भाषेच्या भवितव्याची दोरी या विद्यापीठांच्या हाती. ती जितकी मजबूत तितकं तिचं भवितव्य उज्ज्वल असत.. हे सत्य आहे.
आज गण व तांडा जीवन जगणाऱ्या गोर बंजाराची गोरबोली मरन यातना भोगत आहे. याचे गांभीर्य ओळखून मुंबई अ.भा.गोर बंजारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ख्यातनाम गोर बंजारा साहित्यिक.भीमणीपुत्र मोहन नाईक बापू यांनी गोरबोली संवर्धन होण्यासाठी विद्यापीठात भाषा विज्ञान वा अध्ययन विभागात गोरबोलीला स्थान मिळावे व त्यावर संशोधनात्मक कार्य व्हावे यासाठी महाराष्ट्र शासन स्तरावर केलेला पत्रव्यवहार स्तुत्य असा असून समाजातील सर्व साहित्यिकांनी व समाजप्रेमी यांनी यासंदर्भात आपले मतभेद विसरून या विषयाचा पाठपुरावा करण्याची आजची गरज आहे.
आज महाराष्ट्रात मराठी व इतर भाषेच्या संवर्धन व विकासासाठी जवळपास विद्यापीठे पुढाकार घेत आहे.जसे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा आणि साहित्य या दोहोंवर मराठी विभागातून झालेले आजवरचे संशोधन हे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये नावाजले गेले आहे. मात्र आपली गोरबोली संदर्भात अर्थात, भाषेच्या किंवा तिच्या बोलीभाषेच्या अंगाने फारसे संशोधन व्हावे याचा पाठपुरावा आमच्या राजकीय नेत्यांनी केला नाही वा विद्यापीठात भाषा विभागात कार्यरत असणाऱ्या आमच्या गोर बंजारा संशोधकाने या मुद्यावर फारसे लक्ष देण्याची गरज आहे. आज मराठी भाषिक भाषेच्या विविध अंगाने (संतविषयक, लेखकविषयक, नाट्यविषयक, भाषाविषयक विशेषांकांच्या संदर्भात) संशोधन करीत आहेत, आमची गोरबोली भाषाशास्राच्या निकषात परिपूर्ण उतरते.ती बोली असली तरी एक परिपूर्ण भाषाच आहे. मात्र याकडे दुर्दैवाने दुर्लक्ष केल्या जात आहे. आज वऱ्हाडी आणि अहिराणी बोलींवर विद्यापीठात संशोधन होत आहे. बोली भाषेच्या तौलनिक अभ्यासा बाबात अभ्यासकांचा कल काहीसा वाढलेला दिसतो आहे. संशोधक संत सेना महाराज आणि संत रविदास यांचा तुलनात्मक अभ्यास करीत आहेत.मात्र संत सेवालाल महाराजाच्या विवेकी ,विज्ञानवादी, क्रांतीकारी विचार व चिकित्सक कार्याच्या संशोधनाला अजुनपर्यंत वाव मिळाले नाही.मध्यपूर्व आशियातील साहित्य, भारतीय लेखिकांच्या कादंबऱ्या, साहित्य हे सर्व मराठीत अनुवादित झाले असून त्याचाही धांडोळा काही अभ्यासक आपल्या प्रबंधांमधून घेत आहेत. अनेक विद्यापीठात गौतम बुद्ध, अहिल्याबाई होळकर, सयाजीराव गायकवाड, म. फुले, डॉ. आंबेडकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर, नामदेव ढसाळ, यांच्याशी संबंधित विषय घेऊन पीएच.डी चे कार्य होत आहेत. सध्या एम. फिल. आणि पीएच. डी. करणाऱ्यांमध्ये ग्रामीण पार्श्वभूमी असलेले संशोधक अधिक दिसतात. शिवाय ते दलित, भटके-विमुक्त, आदिवासी, मुस्लिम अशा उपेक्षित समाजघटकांतूनही आलेले दिसतात. मात्र गोर बंजारा समाजातील एकही साहित्यिक आजतगायत आभ्यासला गेला नाही.गोरबोलीत भाषा विज्ञानाचे मोठे सामर्थ्य व लोकसाहित्याचा समृद्ध ठेवा आहे. म्हणून गोरबोली भाषाविज्ञान व तत्सम अत्याधुनिक व शैलीशास्त्र अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास इत्यादी संशोधनाचे नवे प्रवाह वा नव्या वाटा आता हा विद्यापीठात अभ्यासल्या शिवाय गोरबोलीला न्याय मिळणार नाही. गोरबंजारा साहित्याचा वाङ‌्मयीन व भाषिक अभ्यास, स्वरूप आणि शैली, लोकजीवन व लोकसाहित्य मग हे मराठी साहित्य संशोधन प्रमाणे होणे आवश्यक नाही का ? आज गोरबंजारा समाजशास्त्रविषयक वा तौलनिक अभ्यासाचा प्रयत्न दिसून येत नाही. त्याचप्रमाणे भाषावैज्ञानिक व तत्सम अत्याधुनिक व शैलीशास्त्रीय अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास इत्यादी संशोधनाचे नवे प्रवाह वा नव्या वाटा आमच्या गोरबंजारा लोकसाहित्यात ठासून भरलेले आहे. मुख्य धारेपासून दूर असलेल्या गोरबोली व साहित्य साहित्याच्या संशोधन क्षेत्रात चाललेले हे अन्याय गोरबंजारा विकासाला अडसर ठरणार आहे.
म्हणजे,विद्यापीठात ज्याप्रमाणे मराठी ,इतर भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयक संशोधनाची व्याप्ती आणि दर्जा वाढत आहे. त्याप्रमाणे बोलीभाषेच्या संशोधन संदर्भात शासनाने विविध विद्यापीठांतर्गत विविध उपक्रम हाती घेने गरजेचे आहे. बोलीभाषांच्या संशोधनावर आज अनेक विद्यापीठाच्या मराठी विभागाला भाषा व साहित्य संशोधनाची प्रदीर्घ परंपरा आहे. प्राचीन साहित्याच्या संशोधनापासून ते आधुनिक, उत्तरआधुनिक साहित्याच्या अभ्यासापर्यंत संशोधनाची विविधता त्यात आहे. कथनमीमांसा, संरचनावाद, स्त्रीवाद, मानसशास्त्रीय; आदिबंधात्मक समीक्षादृष्टी , आदीम जमाती व लोकसाहित्य इ.च्या परिप्रेक्ष्यात हे अभ्यास सिद्ध झाले आहेत.मात्र कुठेही गोरबोलीचा उल्लेख दिसत नाही.
साहित्याबरोबरच भाषा व बोलींचे संशोधन विभागात गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू आहे. या संदर्भांत ‘मराठी भाषेचा . मराठीच्या अनेक बोलींची वैशिष्ट्ये भाषावैज्ञानिक अभ्यासाद्वारे मांडण्यात आलेली आहेत. उदा. मालवणी, ठाकरी, आगरी, शिंदी भंडारी, सामवेदी आणि वाडवळ इ. बोलीवरील संशोधन सिद्ध झाले आहे. कोळी बोली, कातकरी, वारली व भिल्ली आदिवासी बोली साहित्याचा अभ्यास घडत आहे. याशिवाय मांगेला, कादोडी, मल्हारकोळी, धनगरी, कुणबी, वाडवळी ख्रिश्चन, अहिराणी, भिल्ली आदिवासी उत्तर कोंकणी या बोलींच्या अभ्यासाचे विद्यार्थीपीठात प्रयत्न चालू आहेत. विविध बोलींचे व त्यातील लोकसाहित्याचे दस्तऐवजीकरण होत आहे. त्याच्या आधारे या बोलींचे जतन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.विविध बोली यांवर भाषावैज्ञानिक अंगाने संशोधन पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.बलुतेदारांच्या बोलीचा अभ्यास हे बृहद प्रकल्प विद्यापीठ अनुदान आयोग व भारतीय विज्ञान व सामाजिक शास्त्रे संशोधन संस्था यांच्या सहकार्याने सुरू आहेत ज्याठिकाणीही गोरबोलीचा उल्लेख दिसून येत नाही. गोरबोलीची जडणघडण तांडापाड्यांत झाल्यामुळे आमच्या मौखिक परंपरा, आजही जिवंत आहे. आज गोरबोलीचा संशोधन व्यवहार निखळ राहावा, यासाठी विद्यापीठे आग्रही असली पाहिजे. केवळ साहित्यातले समाजअंग व समाजाभिमूख संशोधनाचा वसा विद्यापीठेच सांभाळू शकतात. समृद्ध गोरबंजारा परंपरेची बूज राखणारे संशोधन विद्यापीठेच करू शकतात.म्हणजे गोरबोली मायबोलीचा उगम, विकास, समृद्धी आणि भवितव्य यांचा विचार करुनच गोरबोलीला न्याय मिळेल. बोलीभाषांची विविध रुपे उलगडून दाखविणारे संशोधन घडेल. गोरबंजारा समाजात भीमणीपुत्र सारख्या ज्या प्रतिभवंत साहित्यिका समवेत आमचे बरेच साहित्यिक ज्यांनी गोरबोलीची भाषेची जी सेवा केली आहे, तिच्या विकासासाठी जो मोलाचा हातभार लावला आहे त्याचे पांग फेडणे या निमित्ताने शक्य होईल. कारण विद्यापीठीय संशोधन म्हटले की त्याला चिंतनमूल्य, समाजमूल्य, संदर्भमूल्य, वाङ‌्मयमूल्य ही चार मूल्ये समाज विकासाला न्याय देऊ शकतात.
बोली भाषा विकास हा विद्यापीठाच्या ’ केंद्रस्थानी आसावा. बोलीविज्ञान, भाषा, समाज, आणि साहित्य या धाटणींचे विषय निवडून त्यावर काही एक मौलिक संशोधन करून गोरबोली ध्वजा उंच करायला साहाय्य करील. गण जीवन व विचार परंपरा सशक्त चालविणाऱ्या आदिम गोरबंजारा परंपरा- ग्रामीण – महानगरी आणि विविध तांडा जीवन नवप्रवाहांच्या मौलिक साहित्यावर, चळवळींवर संशोधन आवश्यक आहे. भाषाविज्ञान, वाङ‌्मयेतिहास, गोरबोली शब्द कोष, साहित्यसिद्धांत, गोरबोली व्याकरण-रचना, तांडा व्यवस्थापन, छंद, बोलीतील सौंदर्यवाद साहित्य अथवा चळवळींचे साहित्य , गोरबोली साहित्यातील आत्मकथने, सण-उत्सवांतील गाणी, शेतमजुरांचे चित्रण,हे विषय विद्यापीठात संशोधनात ‘मध्यवर्ती’ असावेत. बोली भाषा विकास हेच ध्येय महत्वाचे असावे आज अहिराणी बोली व अहिराणी साहित्याच्या अनुषंगाने महाविद्यालय व विद्यापीठीय स्तरावर लक्षवेधी काम झालेले आहे. आज मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत, पारशी, अरबी, जर्मनी अशा अनेक भाषांसोबत व साहित्यासोबत तुलना होत चांगल्या गोष्टींचे आदान-प्रदान करीत मराठी भाषेची समृद्धी अधिकाधिक भक्कम झाली आहे. पण आमच्या गोर बोली भाषेचे काय ?.
विद्यापीठात ज्ञान, विवेक, संस्कार आणि संस्कृती यांचे सक्षम आदान-प्रदान होते हे काम केवळ चोखंदळपणे विद्यापीठेच करू शकतात या आदान-प्रदानातून बोली भाषेचा आणि साहित्याचा त्यायोगे समाजाचा खूप चांगला विकास होऊ शकतो. अशा व्यापक पटलावर विद्यापीठाने मार्मिपणे विचार करावा.
ज्याप्रमाणे विद्यापीठातील मराठी विभाग संशोधनाची विकसनशील भूमिका रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे. बंजारा ‘लोकसाहित्याचे स्वरूप’, ‘लोकसाहित्यातील लोकतत्त्वे’, ‘समाजभाषेचे स्वरूप’, ‘ तांडा साहित्याचे स्वरूप’, व साहित्यविषयक चळवळी’ , आजच्या पुरागामी विचाराचा समाजमनावरील प्रभाव, गोरधर्माचे म्हणजे संस्कृतीचे वलय अशी संशोधनाची अंगे ठरू शकतात.गोर साहित्यातील सामाजिकता’, व तांडा काव्यातील सौंदर्यानुभव’, अशा अनेक विषयांवर संशोधन करण्यास प्राधान्य मिळेल.
आज तर अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाने व­ऱ्हाडी भाषेचा शब्दकोश तयार करण्याचे आव्हान स्वीकारले. या प्रकल्पाची फलश्रुती म्हणजे, त्यातून ‘वऱ्हाडी शब्दकोश’, ‘वऱ्हाडी म्हणींचा कोश’ आणि ‘वऱ्हाडी वाक्प्रचार कोश’ असे तीन स्वतंत्र कोश तयार झाले. मात्र गोर बोलीचा संशोधनाचा रेटा कुणीही लावला नाही.बदलत्या काळानुरूप गोर बंजारा संस्कृतीवर शहरीकरणाचे आक्रमण होत आहे. तांडा संस्कृती व गोरबोली आक्रमणाच्या विळख्यात आहे. तिचे मूळ रूप हरवत चालले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. गोरबोलीचा भाषेचा भाषावैज्ञानिक अभ्यास केला जावा.. गोरबोली संशोधन एवढे मूलगामी आहे की, डॉ. गणेश देवी यांच्यासारख्या भाषावैज्ञानिकाने गोरबोलीची दखल घेतली आहे.
अलीकडच्या काळात कालसुसंगत अशा भाषिक कौशल्य व सर्जनशील लेखनाचा विभागाच्या अभ्यासक्रमात विद्यापीठात समावेश केला गेला. मात्र गोर बोलीला दुर्लक्षित केल्या गेले.तांडा जीवनजाणिवा आणि वाङ‌्मयीन जाणिवा विकसित होण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची आखणी करून गोरबंजारा साहित्य अभ्यासक्रमात कसे येईल याचा आभ्यास व्हावा. भाषा व्यवहार उंच पातळ्यांवरून चालणारा व जीवनाला सर्व अंगांनी व्यापून टाकणारा व्यवहार असतो. कोणताही भाषिक समाज त्यांच्या भाषेतून केवळ लोकव्यवहार व समाजव्यवहार करीत नाही, तर तो त्या भाषेतून ज्ञानव्यवहार व बौद्धिक व्यवहारही करीत असतो. त्यामुळे कोणत्याही बोली भाषेचा विचार करताना त्याच्या संबंधात सुरू असलेल्या तत्संबंधित विविधांगी क्रिया-प्रक्रियांचा, तसेच त्यातील ज्ञानात्मकतेचा विचार करणे आवश्यक ठरते. गोरबोली भाषेचाही विचार याच प्रकारच्या ज्ञानव्यवहारात्मक दृष्टीतून विद्यापीठ स्तरावर संशोधन करणे गरजेचेच आहे.गोरबोली भाषा संवर्धन व रक्षणासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठानी गोरबीली भाषेला आपल्या कवेत घ्यावे ही मा.भीमणीपुत्र मोहन नाईक बापूनी शासनाकडे रेटलेल्या मागणीला समस्त गोरबंजारा बांधव, साहित्यिक, प्राध्यापक, विचारवंत संशोधक व समाजातील राजकीय नेतृत्व करणाऱ्या मान्यवरांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष न करता तथा कुठलाही भेदभाव न करता या मार्मिक मागणीला न्याय देऊन गोर बंजारा समाज विकासाची दिशा त्यायोगे स्पष्ट करावी…

***************

Banjara Live by Gajanan D. Rathod
Prof. Dinesh S. Rathod