ओबीसींचे आरक्षण ७ टक्क्यांनी कमी करा – आ. हरिभाऊ राठोड

ओबीसींचे आरक्षण ७ टक्क्यांनी कमी करा – आ. हरिभाऊ राठोड
ठाणे, १९ सप्टेंबर (हिं.स.) : देशामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या ओबीसी प्रवर्गामध्ये भटके-विमुक्त समाजाच्या ६६६ जातींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भटक्या-विमुक्तांना आरक्षणाचा लाभच मिळत नसल्याने ओबीसींचे आरक्षण ७ टक्क्याने कमी करुन ते भटके-विमुक्तांना देण्यात यावे, अशी मागणी भटके-विमुक्त घुमंतु महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आ. हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या स्वतंत्र आरक्षणासाठी भटके-विमुक्तांनीही रणशिंग फुंकले असून लवकरच या महासंघाच्या वतीने दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे.

हरिभाऊ राठोड यांची नुकतीच भटके-विमुक्त घुमंतु महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका मांडली. आ. राठोड म्हणाले की, देशातील विमुक्त आणि भटक्या समाजाचा ओबीसींमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. मात्र, या ओबीसी समाजातील इतर घटक हुशार आणि पुढारलेले असल्यामुळे त्यांनी या आरक्षणाचा पुरेपुर फायदा घेतला आहे. मात्र, ज्यांना गरज आहे, अशा भटके-विमुक्तांना या आरक्षणाचा काहीही लाभ झालेला नाही. त्यामुळे या समाजाची कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. म्हणूनच हे आरक्षण ७ टक्क्याने कमी करण्यात यावे आणि ते भटके विमुक्तांना देण्यात यावे; अशीच शिफारस मंडल आयोगानेही केली होती. या मागणीसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी भटके-विमुक्त घुमंतु महासंघाच्या वतीने नवी दिल्लीतील रामलिला येथे एका महारॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही आ. राठोड यांनी दिली. रेणेके आयोगाने आपल्या अभ्यास अहवालामध्ये केलेल्या चुकांचा आमच्या समाजाला फटका बसला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी महाराष्ट्राती भटके-विमुक्तांच्या आरक्षणाचे मॉडेल डोळ्यासमोर ठेवावे, अशीही मागणी आ. राठोड यांनी केली. दरम्यान, हार्दीक पटेल यांच्या आंदोलनासंदर्भात विचारले असता, पटेल याला आरक्षणातील काहीही कळत नसून या देशातील मागासजात प्रवर्गाचे आरक्षण संपविण्याचा हा कट रचण्यात आला आहे. तो कट आम्ही उधळून लावू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. हिंदुस्थान समाचार / १९.९.२०१५ / संचिता ठोसर

Haribhau Rathod News

Haribahu Rathod NewsHaribhau Rathod News

Tag: Haribhau Rathod, Vimukt Ghumantu Mahasangh, VJNT