एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे पोलीस दाम्पत्याचे ध्येय…!

एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे पोलीस दाम्पत्याचे ध्येय..
पोलीस दलातील क्रीडापटू दाम्पत्य म्हणून ओळख असलेले दिनेश राठोड आणि त्यांची पत्नी तारकेश्वरी भालेराव-राठोड
एव्हरेस्ट सर करायचे हे अनेक गिर्यारोहकांचे स्वप्न असते. पोलीस दलातील क्रीडापटू दाम्पत्य म्हणून ओळख असलेले दिनेश राठोड आणि त्यांची पत्नी तारकेश्वरी भालेराव-राठोड यांनी एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय ठेवले आहे. पोलीस दलातील कामाच्या वेळा आणि आर्थिक गणित जुळवत राठोड दाम्पत्याने गेले वर्षभर तयारी सुरु केली असून शुक्रवारी (२२ एप्रिल) ते एव्हरेस्टच्या दिशेने कूच करणार आहेत.
राठोड दाम्पत्य पुणे शहर पोलीस दलात क्रीडापटू म्हणून भरती झाले. सध्या ते शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात काम करतात. राठोड दाम्पत्याने पोलीस दलामार्फत ज्यूदो, कराटे, धनुर्विद्या, स्कायडायव्हिंग ( पॅराशूट जम्प),गिर्यारोहण अशा साहसी खेळांमध्ये सहभाग नोंदवून ठसा उमटविला आहे. राठोड दाम्पत्य पोलीस दलातील कामाच्या वेळा सांभाळून गेले दोन वर्ष एव्हरेस्ट हे उत्तुंग शिखर सर करण्यासाठी प्रयत्न करत होते. गेल्यावर्षी त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याच्यादृष्टीने तयारी सुरु केली.मात्र, नेपाळमध्ये आलेल्या भुकंपामुळे त्यांची मोहीम बारगळली.
या मोहिमेविषयी ‘लोकसत्ता’ शी बोलताना राठोड दाम्पत्य म्हणाले, ‘‘नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे एव्हरेस्ट मोहीम बारगळली होती. मात्र, आम्ही जिद्द सोडली नाही. एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी नेपाळ सरकारकडे काही रक्कम भरावी लागते.या मोहिमेसाठी ३८ लाख रुपये खर्च येणार आहे.त्यासाठी आम्ही बॅंकेकडून वैयक्तिक कर्ज घेतले. पोलीस दलाने आम्हाला या मोहिमेसाठी साहाय्य केले. या मोहिमेसाठी काही हितचिंतकांकडून आम्हाला मदत झाली. एवढी जुळवाजुळव करुनही आम्हाला नऊ लाख रुपयांच्या निधीची कमतरता आहे. नेपाळ सरकारकडे आम्ही काही कागदपत्र सादर करुन एव्हरेस्ट सर करण्याची परवानगी मागितली आहे. शुक्रवारी(२२ एप्रिल) आम्ही विमानाने नेपाळला रवाना होणार आहोत.’’
काठमांडूला पोहोचल्यानंतर आम्ही लुकला येथे जाणार आहोत. तेथून आठ दिवसांच्या मोहिमेनंतर एव्हरेस्ट बेसकॅम्पला पोचू. तेथील हवामानाचा अंदाज घेऊन प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात होईल. एव्हरेस्ट सर करण्याची मोहीम ही सर्वस्वी हवामानावर अवलंबून आहे. साधारणपणे पुढील महिन्याभरात आम्ही एव्हरेस्ट सर करुन पुण्याला परतू, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च दहा शिखरे सर करुन आम्ही राष्ट्रध्वज आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज फडकविला होता. ही मोहीम फत्ते केल्यानंतर आम्ही एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा संकल्प सोडला होता. ऑस्ट्रेलियातील मोहिमेमुळे आमचे मनोबल वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
……………………..
गेले वर्षभर एव्हरेस्ट मोहिमेची आम्ही तयारी करत आहोत. सिंहगड आणि सह्य़ाद्रीच्या रांगांवर आम्ही नियमित जात होतो. त्याचा आम्हाला निश्चितच फायदा झाला आहे. एव्हरेस्टसह आम्ही माउंट लोत्से हे शिखर सर करणार आहोत. अशा प्रकारे ही दोन्ही शिखरे एकाच मोहिमेत सर केल्यास आम्ही जगातील पहिले दाम्पत्य ठरु. या विक्रमाची नोंद केली जाईल.
पोलीस शिपाई दिनेश राठोड आणि तारकेश्वरी राठोड
यांना त्याच्या शिखर मोहीमेसाठी
समस्त गोर बंजारा समाजे वडीती हार्दिक शुभेच्छा!
????????????????????????????????????????
गोर प्रकाश राठोड

सौजन्य
गजानन डी. राठोड
चिफ एडीटर- बंजारा ऑनलाईऩ ऩ्युज पोर्टल
वेब- www.goarbanjara.com
संपर्क‎- ९६१९४०१३७७